पुणे : साईबाबाभक्तांसाठी खूशखबर असून पुढील महिन्यापासून शिर्डीसाठी देशांतर्गत विमानसेवा सुरू केली जाणार आहे. तर आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून शिर्डी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानेही उतरू शकतील. पहिल्या टप्प्यात मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या शहरांसह अन्य काही ठिकाणे शिर्डीशी जोडली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पाटील म्हणाले, सुमारे ३५० कोटी रुपये खर्चून शिर्डी विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे. सर्व काम पूर्ण झाले असून विमानतळ सुसज्ज आहे. संपूर्ण खर्च राज्य शासनाने केलेले हे राज्यातील पहिले विमानतळ आहे. सध्या या विमानतळावर २५०० मीटर लांबीची धावपट्टी आहे. या धावपट्टीवर देशांतर्गत प्रवासी विमाने उतरू किंवा उड्डाण करू शकतात. त्यामुळे पुढील महिन्यात मुंबई, हैदराबाद, दिल्ली या शहरांमधून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच त्यानंतर इतर शहरांनाही हे विमानतळ जोडले जाईल. या शहरांमधून सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या उत्सुक आहेत. आॅक्टोबरपासून शताब्दी वर्ष सुरू होत असल्याने त्यापूर्वी परदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य शासनाने ४० कोटी रुपये निधी मंजूर केला असून धावपट्टीची लांबी ३२०० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. हे काम जुलैअखेरपर्यंत पूर्ण करून आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून परदेशातून विमान सेवा सुरू होईल. (प्रतिनिधी)शिर्डीला जाणाऱ्या साईबाबाभक्तांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार जुलै २०१४ ते जून २०१५ या कालावधीत सुमारे ८७ लाख भाविक व पर्यटकांनी मंदिराला भेट दिली आहे. तर दररोज सरासरी ७५ हजार भाविक येतात. सुट्टीच्या दिवशी हा आकडा एक लाखाच्याही पुढे जातो. त्यामधील सुमारे ७९ टक्के हे एका दिवसासाठी येऊन परत जातात. भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी विमान सेवा सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
‘शिर्डी’तून लवकरच होणार विमान उड्डाण
By admin | Published: April 12, 2017 12:02 AM