कोल्हापूर/पेठवडगाव/किणी : राजस्थानमधून महाराष्ट्रात पळून आलेल्या गँगस्टरच्या कारला पुणे-बंगलोर महामार्गावर किणी टोलनाक्यावर अडविले असता, त्यांनी कोल्हापूर पोलिसांवर बेछूटपणे गोळीबार करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघे गँगस्टर गंभीर जखमी झाले.शामलाल गोवर्धन बिश्नोई (वय २२, रा. जोधपूर), श्रवणकुमार मनोहरलाल मांजू बिश्नोई (२४, रा. विष्णुनगर, बारखी, ता. आसिया, जि. जोधपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना शिताफीने पकडून ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. कारचालक श्रीराम पांचाराम बिश्नोई (२३, रा. बेटलाईन जोधपूर) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कक्षामध्ये रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हा थरार सुरू झाला. सुमारे १0 मिनिटे ही चकमक सुरू होती.
पोलिसांनी सांगितले, मंगळवारी सकाळी राजस्थानमधील तिघे गँगस्टर कर्नाटकातील हुबळीहून निघाले. राजस्थान पोलिसांना त्यांची चाहूल लागताच त्यांनी बेळगाव पोलिसांशी संपर्क साधला. बेळगावमध्ये त्यांच्या नंबर नसलेल्या पांढऱ्या कारला अडविण्याचा प्रयत्न झाला असता, तेथील पोलिसांना चकवा देत ते कोल्हापूरच्या दिशेने आले. बेळगाव पोलिसांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या.
आॅपरेशन थरार रात्री ८.५० ते ९.१६पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या टीमने कागल टोल नाक्यापासून उजळाईवाडी महामार्गावर दोन टीम सक्रिय ठेवल्या. गँगस्टर पांढºया स्विफ्ट कारमधून कागल टोलनाक्यापासून पुढे गेले. तेथून त्यांचा पाठलाग सुरू झाला. उजळाईवाडी उड्डाणपुलापासून ते पुढे गेल्यानंतर निरीक्षक सावंत यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण भोसले व पेठवडगाव पोलिसांना संदेश देऊन किणी टोल नाक्यावर नाकाबंदी करण्याच्या सूचना केल्या. टोलनाक्यावर पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याचे समजताच कारचालक श्रीराम बिश्नोई भांबावून गेला. कार मागे वळविण्याचा प्रयत्न करीत असतानाच पाठिमागे पोलिसांची गाडी दिसताच त्याने दूसऱ्या लेनमधून कार पुढे घेण्याचा प्रयत्न केला असता, ती दुभाजकावर आदळली.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार पांडूरंग पाटील यांनी कारवर दगड मारून झडप घालत कारचे स्टेरिंग पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापाठोपाठ कॉन्स्टेबल नामदेव यादव, रणजित कांबळे यांनी कारला घेराव घातला. पोलिसांनी समोर व पाठीमागून घेराव घातल्याचे लक्षात आल्यानंतर कारमधून शामलाल बिश्नोई व श्रवणकुमार मांजू बिश्नोई हे दोघेही दरवाजा उघडून बाहेर पडले. पोलीस त्यांना पकडण्यासाठी पुढे येताच त्यांच्या दिशेने शामलालने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला.
क्षणाचाही विलंब न करता पाठीमागे उभ्या असलेल्या निरीक्षक तानाजी सावंत यांनी प्रत्युत्तरादाखल त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी काही पोलीस महामार्गावर रस्त्यावर आडवे झोपले. शामलाल बेछुटपणे गोळीबार करीत शेतवडीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचे दोन्ही पायावर व श्रवणकुमारच्या डाव्या पायावर पोलिसांंनी गोळीबार करून जखमी केले.
दोघेही जमिनीवर कोसळल्यानंतर झडप टाकून त्यांना पकडले. कारचालक श्रीराम बिश्नोई हा पळून जाणार इतक्यात सहायक निरीक्षक किरण भोसले यांनी त्याला पकडले. किणी टोलनाक्यावर चकमकीचे वृत्त समजताच पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी धाव घेतली. गँगस्टरच्या कारची पोलिसांनी कसून झडती घेतली. या कारसह एक रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केले. जोधपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांचे पथक कोल्हापूरला येण्यासाठी रवाना झाले.
- गोळीला गोळीने उत्तर
किणी टोलनाक्यावर अवघ्या सात फुटांवर पोलिसांच्या दिशेने शामलाल बिश्नोई याने गोळीबार केला. अचानक फायरिंग झाल्याने पोलीस थेट रस्त्यावर झोपले. पाठीमागे असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सावंत यांनी गोळीला गोळीने उत्तर दिल्याने अनेक पोलिसांचे प्राण वाचले. या थरारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार पांडुरंग तुकाराम पाटील (४५) यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले.
- जोधपूर हत्याकांडमधील फरार आरोपी
राजस्थानच्या जोधपूर शहरामध्ये शामलाल बिश्नोई, श्रवणकुमार मांजू-बिश्नोई व श्रीराम बिश्नोई हे कुख्यात गुंड आहेत. त्यांची याठिकाणी मोठी दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लूटमार, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर आहेत. त्यांनी जोधपूर पोलिसांना आव्हान दिले होते. काही सिने अभिनेते, व्यापारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांना ठार मारण्याची धमकी देत होते. जोधपूर जिल्ह्यातील काही हत्याकांडांमध्येही या गुंडांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून तिघेही पसार होते.
- ‘सीपीआर’मध्ये गर्दी
जखमी शामलाल बिश्नोई, श्रवणकुमार मांजू-बिश्नोई यांना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. या ठिकाणी दोघांच्याही पायावर शस्त्रक्रिया केली. सीपीआर आवारात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस निरीक्षक अनिल गुजर हे तळ ठोकून होते.
- यांनी लावली जीवाची बाजी
किणी टोल नाक्यावर गँगस्टरची गाडी येताच हवालदार पांडूरंग पाटील यांनी कारवर दगड मारून झडप घालत कारचे स्टेरिंग पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापाठोपाठ कॉन्स्टेबल नामदेव यादव, रणजित कांबळे यांनी कारला घेराव घातला. या दरम्यानच गँगस्टर शामलालने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. क्षणाचाही विलंब न करता पाठीमागे उभ्या असलेल्या पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी प्रत्युत्तरादाखल त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यांच्या गोळीबारातच दोन्ही गँगस्टर जखमी झाले.
जोधपूर-राजस्थानमधील हे गँगस्टर असून त्यांच्या मागावर पोलीस होते. ते पुण्याला जात असताना किणी टोलनाक्यावर त्यांचा ताबा घेताना त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या चकमकीत दोन गुन्हेगार जखमी झाले आहेत. त्यांची कार व पिस्तूल जप्त केले आहे. एका गुन्हेगाराकडे चौकशी सुरू आहे.- डॉ. अभिनव देशमुख,पोलीस अधीक्षक, कोल्हापूर