नाशिक : महापालिकेचे सत्ताशकट आता पुढील पाच वर्षांसाठी एकट्या भाजपाच्या हाती असणार आहे. मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही स्वबळ अजमावत भाजपाने तब्बल ६६ जागा खिशात टाकल्या. नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात सेनेने अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर महापालिका निवडणुकीतही सेनेची विजयाची वाटचाल कायम राहील, असे संकेत दिले जात होते. परंतु, भाजपाच्या त्सुनामीपुढे सेना वाहून गेली आणि ३५ जागांवरच समाधान मानावे लागले. केवळ पाच जागा मिळविणाऱ्या मनसेची दारुण स्थिती झाली. भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने यंदा प्रथमच सत्तास्थापनेत घोडेबाजाराला लगाम बसणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविण्यात आली. ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूकीत यंदा ६१.६० टक्के विक्रमी मतदान झाले. निवडणूक पूर्व सोशल मिडियावर फिरलेल्या सर्वेक्षणात शिवसेनेच्या बाजूने कौल देण्यात आला होता. याशिवाय, कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे आडाखेही बांधले जात होते. परंतु, भाजपाने स्वबळावर लढताना एकहाती संपादन केली. भाजपाने ११९ जागा लढवत ६६ जागांवर मिळविल्या तर शिवसेनेला १२२ जागांवर लढताना ३५ जागांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत ४० जागा मिळवून पाच वर्षे नवनिर्माणाची प्रतीक्षा करायला लावणाऱ्या मनसेला अपेक्षेप्रमाणे नाशिककरांनी ठेंगा दाखविला. मनसेला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीचीही वाताहत झाली. कॉँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी सहा जागा मिळविल्या. नाशिककरांनी अपक्षांनाही फारसे स्थान दिले नाही. उपमहापौर गुरुमित बग्गा यांचेसह केवळ तीनच अपक्ष निवडून आले. रिपाइंलाही मतदारांनी नाकारत केवळ एकच जागा आठवले गटाच्या पदरात टाकली. माकपाचे मागील निवडणुकीत तीन नगरसेवक निवडून आले होते. परंतु, यंदा माकपाला मतदारांनी शून्यावर बाद केले. निवडणुकीत ७९ नगरसेवक पुन्हा नशिब अजमावत होते. त्यातील ३८ नगरसेवकांनाच विजयाला गवसणी घालता आली तर तब्बल ४१ नगरसेवकांना पराभवाचे धनी व्हावे लागले.