मुंबई – सांगली,कोलाह्पूर आणि साताऱ्यात आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. एकट्या सांगली जिल्ह्यात महापुरामुळे विविध क्षेत्रांतील नुकसान अंदाजे चार हजार कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आता पूरग्रस्तांना सरकारच्या मदतीची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नसून, पूरग्रस्तांना मदत मिळत नाही. तर शासकीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई यादीतच घोळ घातला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र यात मोठ्याप्रमाणात नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब अक्षरशा रस्तावर आले आहेत. तर अनेकांच्या घरातील सामन वाहून गेले आहेत. तर या भागातील पूरग्रस्तांना सरकारी मदत देण्याचे आश्वासने सरकार कडून देण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सरकरी मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचत नसल्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांनी केला आहे.
पूर ओसरल्यानंतर जी शासकीय मदत मिळायला हवी होती, त्यात सरकारी अधिकाऱ्यांनी घोळ घालून ठेवला आहे. तसेच पूरग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई यादीत सुद्धा घोळ करण्यात आला असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच वेळेवर मदत तर मिळाली नाही, पण आता जी मदत दिली जात आहे. ती सुद्धा योग्य लोकांपर्यंत पोहचत नसून, भलत्याच लोकांना मिळत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी मुश्रीफ यांनी केला आहे.