मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांना राज्य शासनाने बुधवारी आर्थिक मदत जाहीर केली. पूर्णपणे घर नष्ट झालेल्यांना प्रत्येकी दीड लाख रुपये अर्थसाहाय्य दिले जाईल, त्यात कच्च्या आणि पक्क्या घरांचा समावेश असेल.
राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच याबाबतचा निर्णय घेतला होता आणि मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार महसूल विभागाने आदेश काढले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांबाहेर जाऊन मदत देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. अंशतः पडझड (किमान ५० टक्के) झालेल्या कच्च्या-पक्क्या घरांसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले जातील. किमान २५ टक्के पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत दिली जाईल. किमान १५ टक्के पडझड झालेल्या घरांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये तसेच नष्ट झालेल्या कपड्यांसाठीही प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना प्रतिकुटुंब पाच हजार रुपये, कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रति कुटुंब ५ हजार रुपये, घरगुती भांडी/वस्तूंच्या नुकसानीसाठीही देण्यात येतील. ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर पाण्यात बुडालेले असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. जनावरांसाठीची मदत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांकडील जनावरे मृत झाली, त्यांनाही मदत दिली जाणार आहे. दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी ४० हजार, ओढकाम करणारी जनावरे प्रत्येकी ३० हजार, ओढकाम करणारी लहान जनावरे प्रत्येकी २० हजार, मेंढी, बकरी, डुक्कर प्रत्येकी ४ हजार रुपये, कुक्कुटपालन पक्षी प्रत्येकी ५० रुपये (पाच हजार रुपयांपर्यंत) अशी मदत दिली जाईल. कुक्कुटपालन शेड नुकसानीसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये, मत्स्य बोटींचे अंशतः नुकसान झालेले असल्यास प्रत्येकी १० हजार रुपये, पूर्णपणे नुकसान २५ हजार रुपये, मत्स्य जाळ्यांचे अंशतः नुकसान ५ हजार रुपये आणि पूर्णपणे नुकसान झाले तरी ५ हजार रुपयांची मदत दिली जाईल.
अंशतः पडझड (किमान ५० टक्के) झालेल्या कच्च्या-पक्क्या घरांसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले जातील.
किमान २५ टक्के पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत दिली जाईल.
किमान १५ टक्के पडझड झालेल्या घरांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये तसेच नष्ट झालेल्या कपड्यांसाठीही प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
पंचनाम्याच्या आधारे मदत- हस्तकला, हातमाग कारागीर बाराबलुतेदार, मूर्तिकार यांना प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल. दुकानदारांना सरसकट किमान ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत-जास्त ५० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल. - टपरीधारकांना प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत-जास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल. स्थानिक रहिवाशांचे स्थानिक मतदार यादीत नाव आहे व रेशनकार्डधारक आहेत, त्यांना पंचनाम्याच्या आधारे मदत मिळेल.