अकोला, दि. १६- नोटाबंदीच्या काळात खासगी बँकेत झालेल्या आक्षेपार्ह उलाढालीवर लक्ष केंद्रित करून प्राप्तिकर विभागाकडून अकस्मात भेटी देऊन झाडाझडती सुरू केली आहे. अकोल्यातील तीन बँकांमध्ये नागपूरच्या आयकर विभागाने मंगळवारी अकस्मात भेट देऊन झाडाझडती घेतली. बँक खात्यातून दोन ते दहा लाखांच्या दरम्यान झालेल्या उलाढालीची माहिती या अधिकार्यांनी घेतली. ज्या खात्यात ही रक्कम जमा झाली, त्या खातेदाराचा आधार कार्ड, पॅन कार्ड याची चाचपणी करीत उत्पन्नाचे स्रोत या अधिकार्यांनी तपासले. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नोटाबंदीदरम्यान ज्या बँक खात्यांमध्ये दोन ते दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली, तसेच ज्या खात्यातून दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम काढण्यात आली, अशांची नोंद आधीच आयकर विभागाकडे पोहोचली होती. अकोल्यातील नामांकित असलेल्या तीन बँकांच्या या आक्षेपार्ह उलाढालीवर लक्ष केंद्रित करून ईडीने तपासणी केली. त्यांचा अहवाल गेल्यानंतर मंगळवारी नागपूर आयकर विभागाचे पथक अकोल्यात दाखल झालेत. दोन दिवसांत या तिन्ही बँकांमधील व्यवहारांची पडताळणी या अधिकार्यांनी केली. यासाठी दोन दिवस नागपूरच्या आयकर विभागाची टीम अकोल्यात तळ ठोकून होती. दरम्यान, बुधवारी हे पथक सायंकाळी रवाना झाले. याबाबत एका बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली. कोणतीही माहिती बँकेने दडवून ठेवली नसल्याचे त्यांनी ह्यलोकमतह्ण ला सांगीतले. दरम्यान, समाधान होईपर्यंत आयकर विभागाच्या अधिकार्यांनी चौकशी केली. आता पुढे काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आयकर खात्याकडून तीन बँकांमध्ये झाडाझडती
By admin | Published: March 17, 2017 3:16 AM