कोल्हापूर/सांगली/मुंबई : मुसळधार पाऊस आणि धरणांतील विसर्गामुळे प्रमुख नद्यांनी धोक्याची लक्ष्मणरेषा ओलांडल्याने कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थिती गंभीर बनली असून अजूनही हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत. चार दिवसांनंतरही मदत न पोहोचल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तब्बल ७०८ गावांना गेल्या काही दिवसांतील पुराचा फटका बसला असून तब्बल २ लाख ४७ हजार जणांना विविध यंत्रणांद्वारे सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. राज्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो गावांना पुराचा वेढा पडल्यामुळे रस्ते वाहतूक बंद आहे. कोल्हापुरातील गोकुळसह इतर दूध संघाचे संकलन बंद आहे. दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होऊ शकला नाही. पाऊस थांबल्याने पूर ओसरू लागला असला तरी आता रोगराई पसरण्याची भीती आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर परिसरातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. सांगली आणि कोल्हापूरमधील पुरस्थिती अतिशय गंभीर असून पंजाब, गोवा, गुजरातमधून मागवण्यात आलेल्या अतिरिक्त पथकांच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दलाच्या मदतीने पूरग्रस्तांना एअरलिफ्टने बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्त १० जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची २४ पथके कार्यरत असून त्यातील सहा कोल्हापूर जिल्ह्यात तर ११ सांगली जिल्ह्यात आहेत. तटरक्षक व इतर कार्यरत दलांची संख्या २० आहे. ३२२ तात्पुरते निवारे तयार करण्यात आले आहेत.बोट उलटून १२ जणांना जलसमाधी; सांगलीतील दुर्घटना, २० जणांना वाचविण्यात यशसांगली/पलूस : ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेत असतानाच बोट पलटी होऊन १२ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी नऊ जणांचे मृतदेह सापडले असून उरलेले बेपत्ता आहेत. बोटीतील इतर २० जणांना वाचविण्यात यश आले. मृतांत २ बालकांसह ७ महिलांचा समावेश आहे.ब्रह्मनाळ येथे कृष्णा व येरळा नदीचा संगम होतो. कृष्णा नदीला महापूर आला असून संपूर्ण ब्रह्मनाळ गावाला महापुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. ग्रामपंचायतीच्या दोन बोटींतून गावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास २ दिवसापांसून बचावकार्य सुरू होते. गुरुवारी सकाळी याच बोटीतून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात येत होते. मात्र बोटीत क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ३५ ते ३७ जण बसले होते. त्यातच बोटीचा पंखा पाण्यातील झाडाझुडुपांत व पाण्याखालील तारेत अडकला. त्यामुळे बोट उलटली. पाण्याला प्रचंड वेग असल्याने काहीही करता आले नाही. थोड्या अंतरावर खटावचे तरुण ब्रम्हनाळच्या नागरिकांना पाण्याबाहेर काढत होते. आरडाओरडा ऐकून त्यांनी तातडीने पाण्यात उड्या घेतल्या. काही तरुणांनी दोन काहिलींच्या मदतीने बोटीकडे धाव घेतली. त्यांना बुडालेल्या काहींना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.
७०८ गावांना पुराचा वेढा; राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 3:21 AM