औरंगाबाद/ पुणे/ अहमदनगर/ नाशिक/ नागपूर/ कोल्हापूर : मराठवाड्यात ५० पेक्षा अधिक दिवसांपासून दडून बसलेला पाऊस शनिवारपासून परतला आहे. विभागातील आठ जिल्ह्यांत रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे नद्यांना पूर आला. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १०४.५५ मिमी. पाऊस झाला.पुणे, सोलापूर व अहमदनगरला चांगला पाऊस झाला. नगरला चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली. सातारा, सांगलीत रिपरिप सुरू होती. खान्देशातही पाऊस परतला आहे. नाशिकलाही पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरणातून गोदावरी नदीत विसर्ग करण्यात येत आहे. अकोल्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, इतर भाग कोरडा होता.जोर कायम राहणारपुढील तीन-चार दिवस राज्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. सोमवारी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.४२१ पैकी १७० मंडळांत अतिवृष्टीऔरंगाबाद (५), जालना (३), परभणी (४), हिंगोली (४), नांदेड (५६), बीड (३५), लातूर (४७), उस्मानाबाद (१६) अशी १७० मंडळांत अतिवृष्टी झाली.रब्बी पिकाला फायदा : मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४३.१७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ५७.५२ टक्के पावसाची नोंद आहे. पाऊस उशिराने झाल्याने खरिपाच्या पेरण्या जवळपास वाया गेल्या आहेत. मात्र आता बरसलेल्या पावसाने चारापाण्याची व्यवस्था होण्याबरोबर रब्बी पिकाला फायदा होईल.
मराठवाड्यात नद्यांना पूर, राज्यातील शेतशिवार भिजले, पावसाचा जोर काही दिवस कायम राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 5:07 AM