भोर : भोर तालुक्यात रविवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताली पडल्या, गाळमातीने शेतातील भाताची रोपे गाडून गेली आहेत. तर अनेक ठिकाणची पिके अद्याप पाण्याखालीच आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रोपे गाडल्याने भाताच्या लागवडीसाठी रोपे कमी पडणार असून, यामुळे लागवड कमी होऊ शकते. त्यामुळे शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे. तर महाड-पंढरपूर व भोर-आंबवडे रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद होती. तर भोर-पसुरे-पांगारी मार्गावरील लहान गाड्यांची वाहतूक वगळता मोठ्या गाड्या, एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.भोर तालुक्यात काल रात्रीपासून पाऊस पडत होता. मात्र सकाळी पावसाचा जोर वाढल्याने डोंगरउतारावर असणाऱ्या करंजगाव, आपटी, निगुडघर, साळव, रायरी, कंकवाडी, पऱ्हर, गुढे, निवंगण यांसह नीरा-देवघर धरणाच्या रिंगरोडवरील सर्वच गावांतील भातखाचरांच्या ताली पडून भाताची रोपे गाळाने गाडून गेली आहेत. पाण्याने खराब होणर असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाताचे तरवे गाडल्याने भाताच्या लागवडीसाठी रोपे कमी पडणार असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करंजगावचे सरपंच संजय मळेकर यांनी केली आहे.दरम्यान, मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नीरा-नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने महाड-पंढरपूर रस्त्यावर आपटी गावाजवळच्या मोरीवर पाणी आल्याने महाड-पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक पहाटे ५ पासून दुपारी १२ वाजेपर्यंत बंद होती. त्यामुळे काही काळ वाहतूक भावेखलमार्गे वळविण्यात आली होती, तर गावच्या ओढ्याचे संपूर्ण पाणी आपटी गावाच्या रस्त्याने वाहत होते. येथील घरातून पाणी घुसले तर नांदगाव येथील भोर-निगुडघर रोडच्या आजूबाजूची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली होती, तर येथील रस्त्यावरील वसंत कुडले यांच्या घरात पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. निगुडघर-म्हसर बु. रस्त्यावरील गोळेवाडी येथील ओढ्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या भागातील वाहतूक आज बंद होती.नेरे : वीसगांव खोऱ्यातील नेरे-आंबाडे परिसरात शनिवार रात्री पासून धो-धो पाऊस पडत आसल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे़ दोन दिवस चाललेल्या मुसळधार पावसाने भागातील शेतकऱ्यांचे भात शेती, विहिरी, घरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़मागील तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावून संततधार चालू आहे़ या भागातील नागरिकांचे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे़ भोर-मांढरदेवी रस्त्यावरील गोकवडी ता़ भोर येथील पुलावरून पाणी वाहत आसल्याने या भागातील रोज प्रवास करणारे शाळेचे शिक्षक, बंँक कर्मचारी, विद्यार्थी, दूधगाड्या व प्रवाशी यांचा दोन ते तीन तास खोंळंबा झाला़ ओढे, नाले ओसंडून वाहत असून भात, कडधान्य खाचरे तुडूंब भरून वाहत होती़ तीन दिवसांत झालेल्या मुसळदार पावसाने कडधान्य खाचरे तुडूंब झाल्याने या पाण्याखाली पिके गाडून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये झाली आहे़ कडधान्यांना मात्र याचा फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांची बिकट अवस्था होईल.भातरोपांचा तुटवडा; क्षेत्र कमी होणारसंपूर्ण आंबवडे खोऱ्यात व काही प्रमाणात हिर्डोशी खोऱ्यात भाताची रोपे लहान असल्याने भाताची लागवड झाली नाही. मात्र, रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे चिखलावडे, करंजे, करंंजगाव, पसुरे, पांगारी या भागातील गावांतील खाचरांच्या ताली पडून भाताची रोपे गाळाने गाडून गेल्याने भाताच्या लागवडीसाठी रोपांचा तुटवडा भासणार आहे. यामुळे लागवडीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. पोखरी घाटरस्ता खचलातळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या व बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाणाऱ्या मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटामधील वळणावर रस्ता खचल्यामुळे हे वळण मृत्यूचा सापळा बनले आहे.बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे वर्षभर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक, पर्यटक व निसर्गप्रेमी येतात. श्रीक्षेत्र भीमाशंकरला जाण्यासाठी मंचर-भीमाशंकर व राजगुरुनगर-वाडा मार्गे तळेघर भीमाशंकर असा रस्ता आहे. परंतु या ठिकाणी येणारे भाविक, पर्यटक राजगुरुनगर वाडामार्गे भीमाशंकर हा रस्ता अत्यंत धोकादायक नागमोडी वळणाचा असल्यामुळे मंचर-भीमाशंकर रस्त्याने प्रवास करणे पसंत करतात.यामुळे या वळणावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातून भीमाशंकर खोऱ्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रस्त्याकडेच्या गटारांतील पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यालगतचा राडारोडा रस्त्यावर आला आहे. घोड नदीला आले पाणी; शेतकऱ्यांत समाधाननिरगुडसर : तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर घोड नदीला पाणी आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले़ अडीच महिन्यांपासून घोड नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे होते़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून गेली होती़ तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला होता़ मात्र, नदीला पाणी आल्यामुळे हा प्रश्न सुटला आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिकांना आधार मिळाला होता़ दोन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले़ पावसाने नदी, नाले भरून वाहू लागले आहेत़, तर घोड नदी दुथडी भरून वाहू लागल्याने बहुतेक गावांचा पाणीपुरवठा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेक गावांत आतापर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता़घोड बंधाऱ्यात पाणी पोहोचले शिरूर : येडगाव धरणातून कुकडी नदीत २७ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असून, या नदीचा घोड नदीशी मिलाप होत असल्याने घोड नदीतीरालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज संध्याकाळी ७ च्या सुमारास शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात पाणी पोहोचल्याने शिरूरकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. धरणक्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे येडगाव धरणातून कुकडी नदीत २७ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यामुळे कुकडी नदीला पूर आला आहे. कुकडी नदीचा शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथे घोड नदीशी मिलाफ होतो. वेगाने सुटलेले हे पाणी घोड नदीत आल्यावर पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने घोड नदीतीरालगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती उपअभियंता सुहास साळवे यांनी दिली. नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे तसेच नगरसेवक, नगरसेविका यांनीही बंधाऱ्याला भेट दिली. धारिवाल व लोळगे यांनी पाणी कधी पोहोचेल याबाबत माहितीही घेतली. पाणी संध्याकाळपर्यंत पोहोचणार असल्याचे समजल्यावर दोघांनीही समाधान व्यक्त केले.
नीरा नदीला पूर; पिके पाण्याखाली
By admin | Published: July 12, 2016 1:47 AM