कोल्हापूर : महाराष्ट्रात ‘अब की बार २२० पार’, असा नारा मी भाजपचा राज्य अध्यक्ष झाल्यानंतर दिला होता. त्याला लोकसभेला २२७ जागांवर युती पुढे असल्याचा आधार होता. लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या तीन मोठ्या निर्णयांचे लोकांना अप्रूप आहे. त्यामुळे महायुतीचे ‘अब की बार २२० पार’ हे आता २५० टचपर्यंत मजल मारणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहाच्या दहा जागा येतील, बंडखोरीचा काही परिणाम होणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत दूरदृष्टीचे आणि संयमी आहेत. कुठलीही आव्हाने आली, तरी विचलित ते होत नाहीत. तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असेही मंत्री पाटील यांंनी यावेळी स्पष्ट केले.पालकमंत्री पाटील यांनी दुपारी पावणेचारच्या सुमारास तपोवन परिसरातील शीलादेवी डी. श्ािंदे सरकार हायस्कूलमधील मतदान केंद्रात येऊन मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोथरुडमध्ये मी स्वत: विधानसभेचा उमेदवार असूनही सकाळ पूर्ण कोथरुडमध्ये दिली. तेथील सर्व केंद्रांवर जाऊन मतदारांना भेटून मी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी कोल्हापूरला आलो. वेळेत येऊन मतदान केल्याचा मला खूप आनंद असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. पुणे, मुंबईतील नोकरदार मतदानासाठी बाहेर पडले.
यावेळी एकूण चित्र पाहता महाराष्ट्रातील निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. १ कोटी ७० लाख लोक असे आहेत की, ज्यांना सरकारकडून काही ना काही लाभ मिळाला आहे. त्यामुळे ते नतद्रष्ट नाहीत. आपला कोणी मित्र उभा आहे म्हणून ते भाजप-शिवसेनेशी गद्दारी करणार नाहीत. परळीबाबत बोलायचे झाले, तर इतक्या खालच्या पातळीला महाराष्ट्रातील राजकारण आणि प्रचार येणे योग्य नाही. बहीण-भावाचे नाते राजकारणामुळे बिघडणार असेल, तर ते चांगले नाही. त्यामुळे मी आणि मुख्यमंत्र्यांनी परळीतील या प्रकाराबाबत निषेधाचे संयुक्त पत्रक काढले असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रात युती ५० जागा जिंकेलआता गोपीचंद पडळकर यांनी चांगली लढत दिली आहे. अजित पवार यांना त्यांच्या मतदारसंघात अडकवून ठेवण्यास ते यशस्वी ठरले आहेत. पडळकर यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने बघूया आता काय होते. सन २०२४ मधील बारामती लोकसभेतील विजयाचे ध्येय असणार आहे. सातारा येथील लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले आणि जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ जागा निवडून येतील. पश्चिम महाराष्ट्रातील ५८ पैकी ५० जागा युती जिंकेल, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.कोथरुडमधील लढत वन-वे, मीच विजयी होईनकोथरुडमधील लढत वन-वे असून त्याठिकाणी मी विजयी होईन. याठिकाणी १ लाख ६० हजारांच्या मार्जिनने मतदानाची मोजणी सुरू होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. निवडणुकांमध्ये आपला पक्ष कसा चांगला, आपली ध्येयधोरणे कोणती, आपण भविष्यात काय करणार हे मांडणे पुरेसे आहे. तो कसा वागला, हा कसा वागला हे सांगण्याची गरज नाही. त्याऐवजी हातवारे काय करता, खालची भाषा काय करता. पावसात भिजल्याने आदर वाढतो, मते मिळत नाहीत, अशी टीका मंत्री पाटील यांनी केली.