- हेमंत आवारी (अकोले, जि.अहमदनगर)
अकोले तालुक्यातील बहिरवाडी मुथाळण्याच्या माळरानावर १०० एकर क्षेत्रावर सेंद्रिय फळबाग उभारणीचे काम ६५ वर्षीय विठ्ठल पाडेकर यांनी सुरू केले आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्यांना एकत्र करून उत्पादित शेतीमाल परदेशात पाठविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
बहिरवाडी येथील विठ्ठल सहादू पाडेकर यांनी एका सेवा संस्थेमार्फत रायगड जिल्ह्यातील कशेळे या आदिवासी पाड्यात स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून रोजगारनिर्मिती आणि स्थानिकांचे सक्षमीकरण यासाठी विविध उपक्रम राबविले होते. त्यात बांबूकाम, औषधी वनस्पतींचे जतन, संवर्धन, सुतारकाम, लोहारकाम गोष्टी शिकवल्या जात. त्यातील फळप्रक्रिया उद्योगाचे ते प्रमुख झाले. कारण त्यांनी म्हैसूर येथे जाऊन ‘फूड टेक्नॉलॉजी’चे प्रशिक्षण घेतले होते. विविध प्रशिक्षणांच्या निमित्ताने जपान, हॉलंड, श्रीलंका, पोलंड देशांमध्ये अभ्यास दौरे केले. याठिकाणीच त्यांनी सुका मोरावळा तयार केला. त्याला ‘आवळा कॅण्डी’ हे नाव दिले.
कॅण्डी म्हणजे स्टिक; पण आवळा गोल असतो तरीही हे नाव त्यांनी दिले. ही ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट असून, त्या अर्थाने ते आवळा कॅण्डीचे जनकच होत. त्यांनी स्वत:च्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. बहिरवाडीतच आवळाप्रक्रिया उद्योगास सुरुवात केली. आता ३०० टन वार्षिक उत्पन्नाची क्षमता आहे. फळप्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल तालुक्यात सेंद्रिय पद्धतीने निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न ते गेल्या काही वर्षांपासून करतात. मुथाळण्याच्या डोंगरपठारावर पडीक माळरानात ८५ एकर जमिनीवर त्यांनी आवळा, आंबा, लिंबू, सीताफळ, करवंद, डाळिंब फळझाडांची लागवड केली आहे.
उन्हाळ्यात मार्चनंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. झाडांना टँकरने पाणी पुरवावे लागते. गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यावर पाडेकर यांनी स्वखर्चाने पाझर तलाव तयार केला. ७५ फूट उंचीच्या या तलावासाठी ५० फूट पाया घेतलेला आहे. अडीच ते चार कोटी लिटर क्षमतेचे तीन शेततळे तयार करण्यात आले. यावर्षी डाळिंबाचे अडीच हजार, चंदनाची पंधराशे आणि बांबू, गावठी सीताफळ, माला डुबियाची तीन हजार झाडे लावली आहेत. फळबागांच्या लागवडीतून माळावर वनराई फुलविण्याचा त्यांचा मानस आहे.
सेंद्रिय शेतीत गीरगार्इंचे गोपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन केले जाणार असल्याचे पाडेकर शेती बघायला येणाऱ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगतात. हल्ली शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कोणी नापिकीला तर कोणी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतोय. मात्र, आत्महत्या हा मार्ग नाही. मनापासून शेती केली तर ती फायद्याचीच आहे, असेही विठ्ठल पाडेकर यांचे म्हणणे आहे.