सावंतवाडी/ आरोंदा : आरोंदा बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंदर कंपनीने संरक्षक भिंत घातल्याच्या पार्श्वभूमीवर पाहणीसाठी आज, सोमवारी दाखल झालेल्या स्थायी समितीच्या दौऱ्यावेळी आरोंदा ग्रामस्थ व मच्छिमार यांचा उद्र्रेक झाला आणि जेटीची आतमधील भिंत तसेच सुरक्षा कक्ष यांची जमावाने तोडफोड केली. त्यानंतर बंदर कंपनीचे समर्थक व ग्रामस्थांच्या जमावात झालेल्या तुफान दगडफेकीत चौघेजण जखमी झाले, तर कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत तणाव निवळलेला नव्हता. जोपर्यंत आमच्यावर दगडफेक करणाऱ्या कंपनीच्या समर्थकांना अटक करत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा आरोंदा ग्रामस्थांनी घेतला आहे. ग्रामस्थांच्या या आक्रमकतेमुळे पोलिसांनी राज्य राखीव दलाची जादा कुमक मागविली असून, जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. आरोंदा जेटी येथे बंदर परिसरात व्हाईट आॅर्चिड या कंपनीने संरक्षक भिंत घालून बंदराकडे जाणारा रस्ता अडविला होता. गेला महिनाभर हा रस्ता खुला करा, अशी मागणी भाजप वगळता सर्वपक्षीयांनी केली होती. मात्र, प्रशासनाने अद्यापपर्यंत भिंत हटविली नव्हती. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दहा दिवसांत रस्ता खुला करा, अथवा मी रस्ता खुला करेन, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद स्थायी समितीने आज सायंकाळी बंदर परिसराला भेट दिली. व्हाईट आॅर्चिड कंपनीकडून दिनेश वालावलकर (रा. कुडाळ) हा युवक जमावाचे चित्रण करीत होता. हे ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी त्या युवकाचा कॅमेरा काढून घेऊन फोडून टाकला. तसेच त्या युवकाचा पाठलाग केला, तर काहींनी दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या जमावावर नियंत्रण मिळविले. मेरीटाईम कार्यालयासमोर बसलेले ग्रामस्थ व मच्छिमारांचा जमाव आरोंदा गावच्या दिशेने बैठक घेण्यासाठी जात असताना जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बंदर कंपनीच्या काही समर्थकांनी जमावाच्या दिशेने दगडफेक केली. याला जमावाने दगडफेकीने प्रत्युत्तर दिले. ही दगडफेक तब्बल २० ते २५ मिनिटे सुरू होती. पोलिसांना न जुमानता व्हाईट आॅर्चिड कंपनीवर तुुफान दगडफेक करण्यात आली. जमावाने सुरक्षा रक्षकांचा कक्ष फोडून टाकला. सुरक्षा रक्षकांच्या कक्षाला आग लावण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच राज्य पोलीस दलाची जादा कुमक मागविण्यात आली. हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (वार्ताहर)राजन तेली ताब्यातमाजी आमदार राजन तेली, काका कुडाळकर व राजन आरोंदेकर यांंना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे रात्री १0.३0 वाजता या तिघांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोंद्यात धुमश्चक्री; चार जखमी
By admin | Published: January 06, 2015 1:16 AM