मनोहर कुंभेजकर,
मुंबई-गोरेगावच्या नव्या उड्डाणपुलाला पाणीवाली बाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या मृणालताई गोरे यांचे नाव देण्याचे प्रथम पालिकेच्या गटनेत्यांच्या सभेत आणि नंतर पालिका सभागृहात मंजूर झाले. आता राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री आणि गोरेगाव विधानसभेच्या आमदार यांनी निमंत्रक म्हणून छापलेल्या कार्यक्रम पत्रिकेत या पुलाचे नाव राममंदिर (मृणाल गोरे) उड्डाणपूल असे छापले आहे. त्यामुळे या प्रकरणी अजूनही भाजपा-शिवसेनेत कलगीतुरा रंगलेला असल्याचेच स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, भाजपाच्या कार्यक्रम पत्रिकेत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि पालिका आयुक्त यांच्या नावांचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हा कलगीतुरा कसा सोडवणार? याकडे गोरेगावकरांचे लक्ष लागले आहे. ‘लोकमत’ने सातत्याने या उड्डाणपुलाबाबत वृत्त दिले होते. ‘लोकमत’ने शुक्रवार (दि. ४ मार्च) च्या अंकात ‘भाजपा-शिवसेना वाद : सावित्री फुले की मृणाल गोरे? गोरेगावात उड्डाणपुलावरून जोरदार रस्सीखेच’ असे वृत्त दिले होते. या बातमीचे गोरेगावात जोरदार पडसाद उमटले. गोरेगाव, जोगेश्वरी आणि दिंडोशी विधानसभा मतदार संघात व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर ‘लोकमत’ची बातमी वेगाने व्हायरल झाली. या पुलाला मृणालताई गोरे यांचे नाव दिलेच पाहिजे, अशी जोरदार मागणी सोशल मीडियातूनही झाली. शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनीही हे प्रकरण चांगलेच उचलून धरले. या उड्डाणपुलाला मृणालताई गोरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेनेचे आमदार, विभागप्रमुख व माजी महापौर सुनील प्रभू सुरुवातीपासूनच आक्रमक होते. प्रभू हे दिंडोशीचे आमदार असले, तरी गोरेगाव(पूर्वे)कडील उड्डाणपूल ते नगरसेवक असलेल्या प्रभाग क्र. ४८मधून जातो. त्यामुळे या उड्डाणपुलाला मृणालताई गोरे यांचे नाव देण्याची मागणी, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) दीपक भूतकर यांच्याकडे गेल्या सप्टेंबरमध्येच केली होती.गेल्या ८ मार्च रोजी ‘महिला दिनी’ या उड्डाणपुलाला मृणालताई यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पी (दक्षिण) विभागाच्या माजी प्रभाग समिती अध्यक्षा प्रमिला शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गोरेगावातील महिलावर्ग घरोघरी गेल्या. अनेक सेवाभावी संस्थाकडेही जाऊन त्यांनी सह्यांची मोहिम राबवली. या पुलाचे नामकरण मृणाल गोरे उड्डाणपूल अशी तमाम गोरेगांवकरांची लोकभावना असताना, या पुलाच्या नामकरणामुळे रंगलेल्या कलगीतुऱ्याने गोरेगावकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.