पुणे : केवळ शिक्षणामुळेच व्यक्तीचा, समाजाचा, राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे गरिबातील गरीब आणि मागासवर्गीय समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर केंद्र शासनाकडून भर दिला जात आहे. परंतु, सर्व काही सरकार करू शकत नाही. त्यामुळे गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या वतीने आयोजित ‘तालीम-ओ-तर्बियत’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी जावडेकर बोलत होते. कार्यक्रमास मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हार्सिटीचे कुलपती जफर सरेशवाला, अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, शिक्षणतज्ज्ञ व कुलपती अमरीश पटेल, अॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया, सेबीचे सदस्य एस. रमण, छत्तीसगढ वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सालीन अश्रफी, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजित गुलाबचंद आदी उपस्थित होते.सच्चर समितीने दिलेल्या अहवालातून मुस्लिम समाजाचे शिक्षणाचे वास्तव समोर आले. मात्र, सर्वच राज्यात मुस्लिम समाजात मागे नाही. त्यामुळे काही राज्यांमधील मुस्लिम समाजाच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मुस्लिम समाजातील सुशिक्षित व दानशूर व्यक्तींनी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी व वसतिगृहांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असेही जावडेकर म्हणाले.अमरीश पटेल म्हणाले, की देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून २०३० पर्यंत ही लोकसंख्या १६२ कोटींच्या पुढे जाईल. त्यामुळे केवळ शहरी भागातच गरिबांच्या मुलांंच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागात अधिक काम करण्याची आवश्यकता आहे.डॉ. झहीर काझी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थेच्या विकासाचा आलेख सांगितला. कार्यक्रमात हॅकेथॉन स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर
By admin | Published: May 01, 2017 1:57 AM