- प्रा.शरद वाघमारे (मालेगाव, जि.नांदेड)शेतकरी शेतात विविध पिकांची लागवड करताना शेतकरी मोठ्या प्रमाणात औषधी फवारणी करीत असतात़ पिकांची लागवड चांगली झाल्यानंतर त्या पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे मावा, तुडतुडे, मित्रकीटक यासारख्या कीटकांचा प्रादुर्भाव झाल्याने हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते़ यावर नियंत्रणासाठी म्हणून देगाव (कु ़), ता़ अर्धापूर, जि़नांदेड येथील युवा शेतकरी बाळू प्रकाश कदम यांनी कीटक नायनाटासाठी कमी खर्चात फोकस सापळा उपकरण तयार केले आहे़ फोकस सापळ्यामुळे कीटक मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत.
बाळू कदम या शेतकऱ्याने आपल्या शेतात ३ बाय २ आकाराच्या पत्र्याच्या डब्याला छिद्र पाडून त्यामध्ये उच्च दाबाचा फोकस लाईट दोरीच्या साह्याने बसविला असून, एका उंच लाकडावर शेतात फोकस सापळा उभा केलेला आहे़ यासाठी त्यांना फक्त ३०० ते ४०० रुपये इतका खर्च आला आहे़ रात्रीच्या वेळी फोकस लाईट सुरू केल्याने वेगवेगळ्या प्रकारचे कीटक प्रखर प्रकाशामुळे व पिवळ्या रंगामुळे फोकस सापळ्याकडे आकर्षित होऊन नष्ट होत आहेत़ सध्या कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वैतागून गेला आहे़
कापसावरील बोंडअळी नष्ट करण्यासाठी अमावास्येच्या गडद रात्री हे फोकस सापळे लावावेत़ याचे कारण याच दिवशी कीटकांची प्रजनन शक्ती जास्त असते़ फोकस सापळ्यामुळे कापसावरील पांढरी माशी, तुडतुडे, मावा, त्याचबरोबर मित्रकीटक, रस शोषण करणारे कीटक नष्ट होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत आहे़ फोकस सापळ्यामुळे शेतकऱ्यांना फवारणी खर्चापासून सुटका मिळत आहे़ अल्पदरातील फोकस सापळा वापरल्यास पिकांमधील कीटकांचा प्रादुर्भाव कमी होण्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बाळू कदम यांनी सांगितले़