गौरीशंकर घाळे
मुंबई : राज्यात अनेक भागात दुष्काळाच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. पाणी व चारा टंचाईमुळे पशुधन संकटात सापडले आहे. यावर तोडगा काढण्यास देवस्थानांकडील अतिरिक्त निधीतून चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले.
सरकारने १५१ दुष्काळी तालुके आणि २५० महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी भागातील पशुधनाच्या रक्षणासाठी धार्मिक संस्था व देवस्थानांकडील अतिरिक्त निधीतून चारा छावण्या उभारण्यात येणार आहेत. राज्यातील अनेक धार्मिक स्थळांकडे जमा झालेला निधी हा बँकांमध्ये पडून आहे. या निधीचा सार्वजनिक आणि समाजोपयोगी कामांसाठी वापर होणे अपेक्षित आहे. दुष्काळी भागातील जनतेसाठी या निधीचा योग्य वापर करण्याच्या सूचना धर्मादाय आयुक्तांनी राज्यातील सर्व धर्मादाय सहआयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना दिले. जिल्हा धर्मादाय आयुक्तांनी जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्थांच्या निधीतून पशुधनासाठी चारा छावण्या उभाराव्यात, तसेच पुरेसा निधी उपलब्ध असल्यास गरिबांसाठी अन्नछत्र चालू करावेत. दुष्काळ नसलेल्या जिल्ह्यांतील धार्मिक स्थळांनी दुष्काळी भागातील चारा छावणीसाठी मदत करावी, असे निर्देशही राज्य धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.छावण्यांसाठी समितीचारा छावण्यातील भ्रष्टाचार आणि त्या निमित्ताने न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमुळे राज्य सरकारने अद्याप चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.चारा छावण्यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.