सोलापूर : लातूरचा पाण्याचा प्रश्न रेल्वेद्वारे सुटला परंतु चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवायचा याबाबत शासन पातळीवर चर्चा झाली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील चारा उस्मानाबाद आणि लातूर येथील चारा छावण्यांना पुरविण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली़ सोलापूर जिल्ह्यात मेअखेर पुरेल एवढा चारा उपलब्ध असून काही चारा शेजारच्या उस्मानाबाद आणि लातूरला देणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त चोकलिंगम यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सविस्तर माहिती घेऊन याबाबत त्यासंबंधीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत़ गुरुवारी पुन्हा उस्मानाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनश पाठक यांच्यासह बीडचे प्रांताधिकारी, उस्मानाबादचे तहसीलदार यांनी सोलापुरात येऊन अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली़ अगोदर जिल्ह्याबाहेर चारा नेण्यास बंदी होती; मात्र दुष्काळामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठवाड्यातील चारा छावण्यांना सोलापुरातून चारा
By admin | Published: April 22, 2016 4:12 AM