देशातील एक प्रतिभावंत नाट्यकर्मी आणि दिग्दर्शक वामन केंद्रे यांना नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा, अर्थात एनएसडीचे यशस्वी संचालकपद सांभाळल्यानंतर केंद्रे पुन्हा एकदा नवे नाटक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांना जाहीर झालेल्या ‘पद्म’ पुरस्कारानिमित्त, तसेच एनएसडीच्या पाच वर्षांच्या कामाबाबत ‘लोकमत’च्या कॉफी टेबल अंतर्गत वामन केंद्रे यांनी संपादकीय विभागाशी साधलेला संवाद.‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला याचा मला आनंदच आहे. मात्र, यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी जे आत्तापर्यंत रंगभूमीवर विविध प्रयोग केले, ज्या नवनवीन संकल्पना रसिकांसमोर आणल्या, त्या विविध नाटकांचा, नाट्यकर्मींचा हा सन्मान आहे, असे मला वाटते. त्याचबरोबर, या विविध नाटकात काम केलेले अभिनेता, अभिनेत्री, तंत्रज्ञ, वेशभूषाकार, रंगभूषाकार, तिकीट विक्रेते, संगीतकार, पडद्यामागचे कलाकार आणि नाटक सतत जिवंत ठेवणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचा हा सन्मान आहे, अशी माझी धारणा आहे. ‘पद्मश्री’ मिळण्याचा आनंद तर आहेच. मात्र, त्याचबरोबर या पुरस्काराने आमचे नाटक मोठे होतेय, याचा मला विशेष आनंद आहे.एनएसडीमध्ये शिकत असताना, भविष्यात एनएसडीच्या संचालकपदी आपली नियुक्ती होईल, असे कधी वाटले होते का?मी कधीच एनएसडीचा संचालक व्हावे, असा विचार केला नव्हता. किंबहुना, एनएसडीतून शिकून बाहेर पडल्यानंतर मी पुन्हा एनएसडीत येईन, असेही मला कधी वाटले नव्हते, पण आपण ज्या क्षेत्रात काम करतो, ते करत असताना वाटेत अशा काही गोष्टी येतात, ज्या आपल्या कामाशी नाळ तुटू देत नाहीत. मी एनएसडीतून बाहेर पडलो, केरळमध्ये संशोधनासाठी गेलो, पण एनएसडीशी माझे असलेले नाते कधी तुटू दिले नव्हते. त्यामुळे अशोक रानडे, पु.ल. देशपांडेंसारख्या दिग्गजांबरोबर काम करता आले. हे सगळे वाटेत येत गेले, ते माझ्या कामाशी मी नाळ एकसारखी जोडून ठेवल्याने. एनएसडीचे संचालकपदही याचाच एक भाग झाला. सुदैवाने, माझ्यावर कधी मला काम द्या, असे म्हणायची वेळ आली नाही. त्यामुळे संचालकपदही मी मागितले नाही, पण कलाक्षेत्रात, नाट्यक्षेत्रात माझ्या हातून काही चांगले घडण्यासाठी मला ज्या माध्यमांची आवश्यकता होती, त्यातले हे एक माध्यम या निमित्ताने माझ्या वाट्याला आले. या माध्यमातून मी नाट्यक्षेत्रासाठी राष्ट्रीय पातळीवर काही करू शकेन, असा माझा प्रयत्न आहे. खरे तर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये आपल्याला आपली पात्रता दररोज सिद्ध करावी लागते. ‘झुलवा’, ‘गजब तेरी अदा’ ही माझीच नाटके माझ्यासमोर दुश्मन म्हणून उभी राहतात, चांगल्या अर्थाने. यापेक्षा चांगले नाटक करून दाखव, असे हे दुश्मन सांगतात. त्यामुळे मी संचालक जरी झालो, तरी नाटकाचा विद्यार्थी म्हणूनच कायम राहणार आहे.
एनएसडीच्या माध्यमातून भारतातील लोककला जगासमोर आणलीत. आदिरंग महोत्सव, भारूड महोत्सव, यामुळे अनेक लोककलांचा संगम एकाच वेळी एका ठिकाणी झाला, याबद्दल काय सांगाल.मुळात आपल्या भारतात अठरापगड जाती आणि भाषा आहेत. एनएसडीच्या माध्यमातून मी या लोककलांचा अभ्यास केला असता, खूप वैविध्यपूर्ण गोष्टी समोर आल्या. लोककलांचा अभ्यास करताना भारतातील वेगवेगळ्या भागांतील आदिवासींची कलाही खूप वेगळी असल्याचे समोर आले. बंगालमधील आदिवासींची लोककला ही जगासमोर आलेलीच नव्हती. त्यातही एक वेगळेपण होते. मराठवाड्यात घडून येणारे भारूड महोत्सव हे त्याचेच एक द्योतक होते. ४० घरे असलेले गाव, पण दरवर्षी या गावात होणाºया भारूड महोत्सवाला हजारोंची गर्दी होते. इथे मला असे वाटते, लोककला ही सर्वोच्च ठरते आणि याच गोष्टीचा प्रामुख्याने आम्ही एनएसडीच्या महोत्सवात समावेश केला, ज्यामुळे एका छोट्या गावातून आलेल्या आदिवासी लोककलाकारालाही एक मोठे व्यासपीठ मिळाले आणि मला असे वाटते, याचे संपूर्ण श्रेय हे एनएसडीमध्ये आम्ही लोककलांसाठी राबविलेल्या उपक्रमांना जाते, ज्यामुळे अगदी गावागावांतील लोककला जगाच्या नकाशापर्यंत पोहोचली.एनएसडीमध्ये तुम्ही रंगभूमीविषयी अनेक प्रयोग केलेत. त्यातल्या इंटरनॅशनल थिएटर्स आॅलिम्पिकविषयी काय सांगाल?थिएटर आॅलम्पिक करणे हा आमच्या जिद्दीचा एक भाग होता. तुम्हाला लक्षात येईल, आजही भारतीय नाटक जगापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचलेले नाही. ब्रिटिशांनी शेक्सपिअरला जगात निरनिराळ्या मार्गांनी पोहोचविला. एका अर्थी त्याला व्यवस्थित प्रोजेक्ट करण्यात आले. मात्र, त्या प्रमाणात आपले भारतीय नाटक जगापर्यंत पोहोचविण्यासाठी एका जिद्दीने, तडफेने, रागाने म्हणा हवे तर... अतिशय कठीण वाटणारे जागतिक थिएटर आॅलिम्पिक दिल्ली आणि भारतातील इतर १६ शहरांमध्ये तब्बल ५१ दिवस अतिशय मेहनतीने सहजरीत्या शक्य करून दाखविले. त्यामुळे आज जागतिक पातळीवर भारतीय रंगभूमीची एक ओळख निर्माण झाली आहे आणि ज्याचा येणाºया पिढीला खूप फायदाही होणार आहे.या आॅलिम्पिकची वैशिष्ट्ये काय ठरली?आम्ही देशात कुठेकुठे नाटकाची पाळेमुळे आहेत, ते आधी शोधून काढले. नंतर त्यात १०० दर्जेदार नाटकांची सर्व भाषांतील नाटकांची यादी केली. हे नाटक फक्त दिल्ली, मुंबईपुरते मर्यादित ठेवायचे नव्हते, म्हणून दिल्लीपासून अगदी तळाशी त्रिवेंद्रमपर्यंत १७ शहरे शोधून आम्ही या शहरांमध्ये या जागतिक दर्जाच्या नाटकांचे प्रयोग केले. जगातले नाटक हे दृश्यप्रधान आणि भाषेशी निगडित असणारे असे नाटक आहे. या नाटकांना याची देही याची डोळा पाहण्याची संंधी भारतीय प्रेक्षकांना मिळाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाषा समजत नसली, तरी आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळतेय, या हौसेपोटी हे नाटक पाहण्यासाठी रसिकांनी संपूर्ण १७ सेंटर्सवरती हाउसफुल्ल गर्दी केली होती. इथे रसिकांना भाषा समजावी, म्हणून आम्ही प्रोजेक्टवर सबटायटल्सची सोयही केली होती. रशियातील एक नाटक तब्बल तीन अंकाचे होते. भव्यदिव्य असे हे नाटक प्रेक्षकांनी अगदी एकाग्रतेने पाहिले आणि मुळात एकही रसिक तीन अंक असूनही जागचा हलला नाही, हे मला इथे प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते. कारण मुळात आपल्या येथील रसिक जागतिक नाटक पहिल्यांदा इतक्या सुंदर पद्धतीने पाहत होता.नवीन मराठी रंगभूमीविषयी, त्यात आलेल्या कॉर्पोरेट कंपन्याविषयी तुमचे काय मत आहे?- मला असे वाटते की, कॉर्पोरेट कंपन्या येण्याविषयी मला काहीच हरकत नाहीये. कारण मुळात त्यांच्या येण्याने नाटकाला गर्दी वाढत असेल, नाटक समृद्ध होत असेल, निर्मात्यांना फायदा होणार असेल, तर मराठी नाट्यनिर्मात्यांनी खुल्या दिलाने या गोष्टीचे स्वागत करायला हवे. शेवटी नाटक मोठे होते. त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या जर अशा कंपन्या येणार असतील आणि नाटकाला चांगले दिवस येणार असतील, तर नक्कीच या गोष्टींचा विचार व्हायला हवा.केंद्रे घराण्यातील पुढची पिढी अर्थात ऋ त्विक केंद्रेने अभिनयात पदार्पण केलेय. तुम्ही त्याच्या कामाची कशी समीक्षा करता?ऋत्विक चांगली प्रगती करतोय आणि दिवसेंदिवस त्याच्यातला नट समृद्ध होतोय, याचे मला जास्त कौतुक आहे. मुळात मी आणि गौरीने कधीच त्याच्यावर हे कर किंवा ते कर, असा दबाव टाकलेला नाही. त्यामुळे त्याला रुचेल, आवडेल अशी कामे तो करतोय आणि अगदी उत्तमरीत्या निभावतोय, याचा एक वडील म्हणून मला खूप अभिमान वाटतो.भविष्यात केंद्रे सरांचे नाटक रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे का?हो नक्कीच पाहायला मिळणार आहे. सध्या मी काही संहितांवर काम करतोय. मी नुकताच दिल्लीवरून परतलोय, पण खूप वर्षांत व्यवसायिक रंगभूमीवर नाटक केले नाहीये. त्यामुळे सध्या काही विषयांवर बारकाईने वाचन, शोधकाम सुरू आहे. अनेक लेखक मित्रांशी नवीन विषयांवर सध्या चर्चा सुरू आहेत. कदाचित, आॅगस्ट, २०१९ पर्यंत एक नवीन नाटक घेऊन मी नक्कीच मराठी रसिक प्रेक्षकांसमोर यायचा प्रयत्न करतोय.(शब्दांकन - अजय परचुरे)