जळगाव : ‘मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म’ याच दोन गोष्टी कटाक्षाने पाळा. जातीभेद टाळा, प्रत्येकाचा सन्मान करा, नातीगोती जपा. सदाचार-नितीमुल्ये पाळा, असे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी येथे हजारो भाविकांशी हितगूज करताना सांगितले.आप्पासाहेब म्हणाले की, प्रतिष्ठानद्वारे धर्माधिकारी परिवाराने हजारोंच्या सहकार्याने घडवून आणलेल्या सामाजिक जागृतीचे, सेवाकार्याचे येथे तैलचित्राद्वारे स्मरण करून दिले जात आहे. ते प्रत्येकाच्या मनात ठसावे, यासाठी हे प्रदर्शन आहे. हेवेदावे, दंगली, एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे, अंधश्रद्धा आदी प्रकार बंद व्हावेत. एखाद्या कुटुंबाला बहिष्कृत करणे, हा उपाय नाही, काही वाद असेल तर सुसंवादाने मार्ग काढावा.‘हात फिरे तिथे लक्ष्मी वसे’ या म्हणीची आठवण करून देत आप्पासाहेब म्हणाले की, ही म्हण आचरणात आणा, रस्त्यावर कचरा टाकू नका. सोबत पिशवी ठेवत त्यात टाका, नंतर योग्य जागी टाका. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांचे सुपुत्र सचिन धर्माधिकारी यांनीही हितगूज केले. (प्रतिनिधी)कसली आली साडेसाती ?अज्ञान अधोगतीकडे नेते, ज्ञानाची भूमिका स्वीकारा. ज्योतीष हीदेखील अंधश्रद्धाच! साडेसाती आदी काहीही नसते. ग्रह वर आकाशात आणि आपण खाली. कसली आलीय साडेसाती? साडेसाती हे आॅडिट आहे़ त्याला उपाय, मार्ग असतोच, आहेच, असे त्यांनी सांगितले. अंगठीत खडे वापरा, ते चांगले दिसतात़ त्यांना नावे आपण दिलीत़ ते थोडेच स्वत:ची नावं सांगतात, असेही त्यांनी सांगितले.
मानवता धर्माचे पालन करा
By admin | Published: January 06, 2015 2:06 AM