सांगली : शिक्षण क्षेत्रात कलाध्यापक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करून महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळातर्फे सांगलीच्या शांतिनिकेतन महाविद्यालयात शनिवारी ३८ व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेस प्रारंभ झाला. यावेळी खासदार पाटील बोलत होते. ते म्हणाले की, कलेचा आणि माझा फारसा कधी संबंध आला नाही. तरीही कलाकारांबद्दल आणि विशेषत: कलाध्यापकांबद्दल मला आदर वाटतो. शिक्षणक्षेत्रात त्यांचे योगदान आणि भूमिका महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. सर्वच मागण्या मान्य होणार नाहीत, मात्र ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी लवकरच चर्चा करून कलाध्यापकांच्या प्रश्नावर बैठक बोलावण्यात येईल. आ. सुधीर गाडगीळ म्हणाले की, कला, क्रीडाचे शिक्षक शाळांमध्ये असायलाच हवेत. सांगलीला चित्रकारांची मोठी परंपरा आहे. पंत जांभळीकर, कल्याण शेटे यांच्यासारखे प्रसिद्ध चित्रकार सांगलीत घडले. कला आणि सांगली यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. येथील कलाक्षेत्र अधिक व्यापक आहे. त्यामुळे कलाध्यापकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व ते सहकार्य करण्यास तयार आहे. माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले की, चित्रकला विषय अत्यंत महत्त्वाचा असतानाही त्याकडे शासकीय पातळीवर दुर्लक्ष झाले आहे. दहावीच्या परीक्षेला चित्रकलेचा शंभर गुणांचा पेपर असावा, अशी प्रमुख मागणी शासनदरबारी करणार आहोत. संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत माळी यांनी स्वागत, तर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शांतिनिकेतनचे संचालक गौतम पाटील, प्राचार्य बाळासाहेब पाटील, अॅनिमेटर भीमाशंकर शेंडगे, सौ. समिता पाटील उपस्थित होते. दादा भगाटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) शेंडगे यांना "जीवनगौरव"भारत सरकारच्या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजनचे अॅनिमेटर आणि माजी निर्माता भीमाशंकर शेंडगे यांना अधिवेशनात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे याचे स्वरूप होते. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिका समिता पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. चित्रकला प्रात्यक्षिकाचा आनंदपरिषदेतील मोकळ््या वेळेत काही चित्रकारांनी व्यक्तिचित्रे रेखाटून उपस्थितांना कलाविश्वाची सफर घडविली. या चित्रांना उपस्थित रसिकांनीही दाद दिली. कोल्हापूर येथील सागर बगाडे यांनी नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
कलाध्यापकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करू: संजयकाका पाटील
By admin | Published: April 23, 2017 12:26 AM