ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १५ : मालेगाव बॉम्बस्फोटात झालेल्या घडामोडीवर आपण बोलणार नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान आहे. मात्र, या प्रकरणात राज्य पोलीस विधी तज्ज्ञांच्या सल्लयानुसार कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) प्रवीण दीक्षित यांनी नोंदविली. हिंगणा, जुनी कामठी आणि कामठी पोलीस ठाणी पोलीस आयुक्तालयाला जोडण्यात आली. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस महासंचालक दीक्षित शनिवारपासून नागपुरात आहे. . मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्याच्या कारणावरून राष्टीय तपास पथकाने (एनआयए) त्यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत दाखल केलेले गुन्हे काढून घेण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. एटीएसच्या चौकशीवर ठेवण्यात आलेला ठपका तसेच या अनुषंगाने निमार्ण झालेल्या स्थितीवर पत्रकारांनी दीक्षित यांना विविध प्रश्न विचारले. त्यातील अनेक प्रश्नांचे उत्तर देण्याचे दीक्षित यांनी टाळले. 'न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान' आहे. आपण त्यावर काही बोलणार नाही. मात्र, या प्रकरणाच्या तपासातील त्रुटी आणि पुढील कारवाईसाठी विधी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. त्यानुसारच पुढील कारवाई करण्यात येईल, असे दीक्षित म्हणाले. या संबंधाने उपस्थित झालेल्या अन्य प्रश्नांना दीक्षित यांनी बगल दिली. अण्णा हजारे यांना मिळालेल्या धमकीचा प्रश्न उपस्थित झाला असता, अण्णांना प्रभावी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. योग्य ती काळजी घेतली जात असून, चिंता करण्याचे कारण नसल्याचेही दीक्षत म्हणाले.