ठाणे : लोकांचे समाधान होईल, अशा वेगाने काम करा. सहकारविषयक कामे करण्याची आवड असलेल्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. तर, गृहनिर्माण संस्थांनी आपला लेखापरीक्षण अहवाल अपलोड करणे, कचऱ्याच्या समस्या, इतर अडचणी स्वत:हून सोडवणे आवश्यक आहे. तसेच या शहरात काही गृहनिर्माण संस्था चांगल्या प्रकारे काम करीत असून त्यांचा सत्कार करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन सहकार विभागाच्या अपर मुख्य सचिव एस.एस. संधू यांनी बुधवारी ठाण्यात बोलताना केले. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयांचे गावदेवी मंडईच्या पहिल्या माळ्यावर स्थलांतर झाले असून या कार्यालयांचे उद्घाटन संधू व महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाले. या वेळी या वास्तूसाठी ठाणे महानगरपलिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले आहे. त्याबद्दल त्यांचेही त्यांनी आभार मानले. लोकांच्या मनात कार्यालयांतील वातावरण पाहून प्रसन्नता निर्माण व्हावी. सहकार विभागाची जुन्या जागांतील कार्यालये नवीन जागेत स्थलांतरित करण्याचा आमचा मानस असून याची सुरु वात ठाणे जिल्ह्यापासून सुरू झाल्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले. ठाणे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात २४ हजार १३६ संस्था नोंदणीकृत आहेत. लोकांना सेवा देण्यासाठी कर्मचारीवर्ग कमी पडत असून ताण वाढत आहे. परंतु, या कार्यालयाने दोन वर्षांत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. रेकॉर्ड रूमचे योग्य व्यवस्थापन केले आहे, असे सांगून ठाणे जिल्हा उपनिबंधक कार्यालय राज्यात उत्कृष्ट व्हावे, असेही ते म्हणाले.याप्रसंगी कोकण विभागीय सहायक निबंधक ज्योती नाटकर, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा उपनिबंधक दिलीप उढाण, उपनिबंधक डॉ. अशोक कुंभार, मुंबई विभाग सहकार निबंधक आरिफ, लेखापरीक्षण अधिकारी चौरे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील, नगरसेवक संजय वाघुले, गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, डॉ. अशोक कुंभार, भूमी अभिलेख संघटना पदाधिकारी, वकील संघटना पदाधिकारी, ठाणे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी व गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)>24,136 संस्था नोंदणीकृत आहेत. लोकांना सेवा देण्यासाठी कर्मचारीवर्ग कमी पडत असून ताण वाढत आहे. परंतु, या कार्यालयाने दोन वर्षांत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. रेकॉर्ड रूमचे योग्य व्यवस्थापन केले आहे, असे सांगून ठाणे जिल्हा उपनिबंधक कार्यालय राज्यात उत्कृष्ट व्हावे, असेही ते म्हणाले.
चांगली कामे करणाऱ्यांचा सत्कार
By admin | Published: March 03, 2017 3:56 AM