मुंबई : राज्यातील जनतेला अन्नाविषयी साक्षर करून सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यास ‘अन्न साक्षरता व अन्न सुरक्षा’ योजना राबविण्यात येणार आहे. सुरक्षित अन्न पुरवठा करणे ही अन्न व्यावसायिकांची जबाबदारी असून अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे मत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केले.दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी व दूधाचा दर्जा उच्च प्रतीचा राखण्यासाठी आयुक्त भापकर यांनी मंगळवारी दुपारी प्रशासनाच्या मुख्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातून दूध व दुग्धजन्य पदार्थांचे ४०० अन्न व्यावसायिक, डेअरीचे अध्यक्ष, चिलिंग प्लाँट, प्रक्रिया केंद्रे मुख्य, वितरक इत्यादी उपस्थित होते. राज्यात सुरू होणाऱ्या योजनेतंर्गत ग्राहक, विद्यार्थी, महिलांना अन्न सुरक्षेबाबत साक्षर केले जाणार आहे. छोटे अन्न व्यावसायिक, पदार्थांचे विक्रेते, किरकोळ विक्रेते, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे विक्रेते, अन्न सेवा पुरवणारे शासकीय सेवेतील अधिकारी, शालेय पोषण आहार यांची जनजागृती करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दूध भेसळीबाबत कठारे कार्यवाहीचे आदेश असल्याचे विषद करून प्रशासनसुद्धा याबाबत कार्यवाही करणार असल्याचे प्रशासनाचे सह आयुक्त (दक्षता) ज्ञानेश्वर फडतरे यांनी सांगितले. एफडीए व पोलीस यंत्रणा यांच्या मध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. दूध भेसळीबाबत ग्राहकांनी कुठे संपर्क साधावा याबाबत उपाययोजना करावी, असे ग्राहक पंचायतच्या डॉ. शुभदा चौकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राज्यात आणणार अन्न साक्षरता व अन्न सुरक्षा योजना
By admin | Published: December 24, 2014 2:27 AM