ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. १३ - शाळा सोडलेली, व्यसनाधीन झालेली, हाणामाऱ्या करणारी झोपडपट्ट्यांतील मुले आता चक्क फूटबॉल चॅम्पियन बनू पाहत आहेत. नगर शहरात असे चाळीस फूटबॉल पटू तयार झाले आहेत. सध्या हा संघ नागपूरला राज्यस्तरीय स्पर्धा खेळतोय. नगर शहरात बालभवन ही संस्था झोपडपट्ट्यांमध्ये शिक्षणाचे काम करते. दररोज संध्याकाळी झोपडपट्टीत वर्ग भरवून तेथे मुलांचा अभ्यास घेतला जातो. या वर्गांत येणाऱ्या तसेच इतर शाळाबाह्य मुलांनाही शाळांची गोडी लागावी यासाठी बालभवनने फूटबॉल सुरू केला. या मुलांना फूटबॉल खेळायला लावला. त्यातून ही मुले अगोदर संस्थेत व नंतर शाळेत रमू लागली. सध्या दररोज चाळीस मुले पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर दररोज सायंकाळी फूटबॉल खेळतात. या मुलांत १२ ते १७ वयोगटांची मुले आहेत. बालभवनने एक नियमही बनविलाय. ‘नो स्कूल, नो फूटबॉल’. म्हणजे मुले शाळेत गेली नाही तर त्यादिवशी मैदानावर त्याला खेळू दिले जात नाही. ‘स्लम सॉकर’ नावाची एक संस्था आहे. ही संस्था झोपडपट्ट्यांतील मुलांसाठी फूटबॉलची स्पर्धा घेते. बालभवनला ही माहिती मिळाल्यानंतर नगरचा संघ आता नागपूर येथील या स्पर्धेत सहभागी झाला आहे. १३ व १४ आॅक्टोबरला ही स्पर्धा होत असल्याचे बालभवनचे संचालक हनिफ तांबोळी यांनी सांगितले. या राज्यस्तरीय स्पर्धेनंतर मुलांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीही निवड होणार आहे.बालभवनच्या टीममधील काही मुलांनी शाळांच्या माध्यमातून विविध स्तरावर चांगली कामगिरी केली. अविनाश घोरपडे नावाचा नववीतील मुलगा विभागीय स्तरावर खेळला आहे.