मावळ : राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, सत्तास्थापनेचा पेच अजूनही सुटलेला नाही. महायुतीच्या २०० पेक्षा जास्त जागा आल्या आहेत. तरी सुद्धा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असतानाच मावळातील तरुणांनी एक अनोखं धाडस केलं आहे. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी तरुणांनी ८०० फूट उंच कड्यावरुन बॅनर झळकावला आहे.
अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत आणि मावळचे आमदार सुनिल शेळके यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं, अशा आशयाचा ३० फुटांचा मोठा बॅनर ८०० फुट उंचीच्या नागफणी कड्यावर झळकावण्यात आला आहे. मावळातील तरुणांनी यशस्वीरित्या नागफणी सुळक्यावर चढाई करून वाऱ्याच्या वेगाचा सामना करत हा मोठा बॅनर झळकावला आहे. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच, या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा सुद्धा होत आहे.
दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आपलाच नेता मुख्यामंत्री व्हावा; अशी महायुतीतील तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत; अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नागफणी कडा चढाईला अत्यंत धोकादायकनागफणी कडा हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा लगतच्या घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा चढाईला अतिशय दुर्गम व कठीण आहे. याला ड्युक्स नोज (Dukes Nose) असंही म्हणतात. गिर्यारोहणाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या मदतीशिवाय या सुळक्यावरील चढाई अवघड मानली जाते.