बाबूजी हे खणखणीत नाणे,  १०० रुपयांच्या नाण्याचं लोकार्पण; दिग्गजांनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:21 AM2024-07-03T06:21:19+5:302024-07-03T06:38:17+5:30

लोकमत समूहाचे संस्थापक व प्रसिद्ध स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारने शंभर रुपयांचे एक स्मरणीय नाणे जारी केले. भारत सरकारच्या मुंबई टांकसाळीत हे नाणे तयार करण्यात आले. त्याचे मुंबईत लोकार्पण झाले.

For Birth centenary of famous freedom fighter Jawaharlal Ji Darda, Government of India has issued a commemorative coin of Rs hundred | बाबूजी हे खणखणीत नाणे,  १०० रुपयांच्या नाण्याचं लोकार्पण; दिग्गजांनी लावली हजेरी

बाबूजी हे खणखणीत नाणे,  १०० रुपयांच्या नाण्याचं लोकार्पण; दिग्गजांनी लावली हजेरी

मुंबई - ध्येयवादी स्वातंत्र्यसेनानी, मुत्सद्दी राजकारणी आणि व्यासंगी पत्रकार असा त्रिवेणी संगम ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता ते स्व. जवाहरलाल दर्डा हे एक नावाप्रमाणेच ‘जवाहर’ होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला गौरव, बाबूजी म्हणजे सामाजिक, राजकीय व पत्रकारितेतील खणखणीत नाणे असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शब्दसुमनांजली, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जागवलेल्या बाबूजींच्या सहवासातील आठवणी, किस्से आणि जवाहरलालजींच्या १०१ व्या जयंतीनिमित्त शंभर रुपयांच्या नाण्याचे लोकार्पण अशा रंगतदार देखण्या सोहळ्याचे राजकारण, प्रशासन, उद्योग, कला आदी क्षेत्रांतील शेकडो दिग्गज साक्षीदार होते.

विरोधकांत असले एकमत तरी महाराष्ट्रात आमच्या बाजूने आहे ‘लोकमत’. देशात नरेंद्र व माझ्याबरोबर आहे देवेंद्र.‘लोकमत’मध्ये आहे राजेंद्र. त्यामुळे ‘विजय’ आमचाच आहे. विरोधकांनी कितीही केला ओरडा, आमच्या मागे आहे ‘लोकमत’चे दर्डा, अशा ओळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणाच्या शेवटी सादर करताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

‘खरा दादा इथेच...’
विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसवून मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमाला आलेले असल्याचा उल्लेख विजय दर्डा यांनी केला होता. तोच धागा पकडून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही दोघे निघालो तेव्हा अर्थसंकल्पावरील चर्चा असल्याने मी येऊ शकत नाही, हे विजयबाबूंना सांगा, असे अजितदादा आम्हाला तीनवेळा म्हणाले. त्यामुळे खरा दादा इथे बसला आहे, असे हसत हसत शिंदे म्हणाले. गरीब व्यक्ती हा मुख्यमंत्र्यांच्या मनाचा हळवा कोपरा असल्याचा उल्लेख दर्डा यांनी केला. 

स्वतंत्र विचाराचे स्वातंत्र्यसेनानी होते बाबूजी : शिंदे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात जवाहरलाल दर्डा यांच्यासोबत मीही १९७४ साली होतो. त्यावेळी वसंतराव नाईक, शेषराव वानखेडेजी आणि जवाहरलाल दर्डा असे विदर्भाचे त्रिकूट महाराष्ट्रात होते. जे काही होत असे ते या तिघांच्या विचाराने; पण बाबूजींनी कधी वर्चस्व गाजवले नाही. ते स्वतंत्र विचारांचे थोर स्वातंत्र्यसेनानी आणि स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्त्व होते, असे गौरवोद्गार काढताना माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला.

शिंदे म्हणाले, ज्या थोड्या लोकांना बाबूजींबरोबर काम करण्याची संधी मिळाली त्यांत मी, शरदचंद्र पवार, मधुकरराव चौधरी हे होते. बाबूजींनी विनोबा भावे, इंदिरा गांधी यांच्यासोबत कठीण परिस्थितीत काम केले. त्यांच्यावर आरोप व्हायचे की, काँग्रेसचे असूनही ते काँग्रेसविषयी पेपरमध्ये काहीही लिहितात, असे कसे चालेल? पण बाबूजींनी मराठी पत्रकारितेच्या परंपरेला साक्ष ठेवून काम केले, त्याचा महाराष्ट्राला विसर पडणार नाही.

इंदिराजींच्या कठीण काळात बाबूजींची सोबत : चेन्नीथला

इंदिरा गांधी जेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अत्यंत खडतर टप्प्यावर होत्या त्यावेळी जवाहरलाल दर्डा हे भक्कमपणे त्यांच्यासोबत होते. त्या काळात इंदिरा गांधी यांच्या अनेक निकटवर्तीयांनी त्यांची साथ सोडली होती. परंतु, जवाहरलाल दर्डा यांनी त्यांना खंबीर साथ दिली, अशी आठवण काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितली. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची कामगिरी बजावली. विनोबा भावे यांच्यासोबतही त्यांनी सक्रिय समाजकारण केल्याचे चेन्नीथला म्हणाले.

यावेळी लोकमत आणि दर्डा परिवार यांच्यासोबत असलेल्या घट्ट नात्याच्या आठवणींनादेखील त्यांनी उजाळा दिला. जवाहरलाल दर्डा यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात १७ वर्षे विविध खात्यांच्या मंत्रिपदाचा भार सांभाळला. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते त्यावेळी ते त्यांच्या मंत्रिमंडळात होते. या काळात त्यांची भेट झाली होती. त्यावेळी आपुलकीने आपली चौकशी त्यांनी केल्याची आठवणही त्यांनी सांगितली. 

काय आहेत नाण्याची वैशिष्ट्ये?

३५ग्रॅम 

५०% चांदी

४०% तांबे

५% निकेल

५% जस्त

नाण्याच्या पृष्ठभागी जवाहरलाल दर्डा यांच्या छायाचित्रावर देवनागरीत ‘श्री. जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी’ असे लिहिलेले आहे. छायाचित्राच्या उजव्या आणि डाव्या बाजूला १९२३ व २०२३ आहे. नाण्याच्या अग्रभागी अशोक स्तंभाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला भारत आणि इंडिया लिहिलेले आहे. 

Web Title: For Birth centenary of famous freedom fighter Jawaharlal Ji Darda, Government of India has issued a commemorative coin of Rs hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.