पुणे - गणेशोत्सवाने भारावलेली पुण्यभूमी...‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष... तालांच्या ठेक्यासाठी सज्ज पथके आणि ढोलताशांचा दणाणून टाकणारा आवाज... अशा वातावरणात ‘लोकमत’ने घडविलेल्या ‘ढोलताशा’चा गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्डचा विश्वविक्रम झाला. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच तालवाद्यात या विश्वविक्रमाची नोंद झाली.
पुण्याच्या गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा लाभली असून, गणेशाचे आगमन वाजतगाजत करण्याची प्रथा आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा ‘ढोलताशा’ वादनाशिवाय पूर्ण होत नाही. महाराष्ट्रातील पारंपरिक वादनाची ही परंपरा पुढे नेण्याबरोबरच ‘ढोल वादना’ला जागतिक उंची प्राप्त करून देण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला. पुण्यात जवळपास अंदाजे तीनशेच्या वर ढोलताशा पथके आहेत. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी दोन ते तीन महिन्यांपासून ढोलताशा पथकांसह वादकांच्या बैठका घेतल्या. त्यासाठी ताल ठरविण्यात आले होते. कसे वादन करायचे, हे वादकांना सांगण्यात आले होते. त्यासाठी महिनाभर वादकांनी कसून सराव केला. या वादकांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, महाराष्ट्राच्या पारंपरिक वाद्याला जगाच्या नकाशावर स्थान मिळाले आहे.
लोकमत आयोजित ‘टू साइडेड ड्रम रिले’चा गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड या कार्यक्रमाला विलास जावडेकर डेव्हलपर्स आणि ग्रॉव्हिटस फाउंडेशन प्रायोजक असून या कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे, साखर आयुक्त कुणाल खेमनार, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुणे महापालिका शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विलास जावडेकर डेव्हलपर्सच्या संचालिका अस्मिता जावडेकर, ग्रॉव्हिटस फाउंडेशनच्या संचालिका उषा काकडे, प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे, कारेगावच्या सरपंच निर्मला नवले, साहित्यिक संगीता बर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे काका चव्हाण आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
असा घडला विक्रम
एका वेळी एक वादक येऊन त्याने पहिल्या तालाची पाच आवर्तने वाजवली. एकाचे वादन संपल्यावर दुसऱ्या वादकाला १५ सेकंदाचा वेळ देण्यात आला होता. यात प्रत्येकाने लय राखणे महत्त्वाचे असल्याने वादन करणे खूप अवघड होते. मात्र सर्व पथकांनी विश्वविक्रमासाठी मोठी मेहनत घेतली होती. वादकांनी लोकमतच्या ऐतिहासिक विश्वविक्रमात मोलाचे सहकार्य केले. महाराष्ट्राच्या ढोलताशाच्या परंपरेत पहिल्यांदाच अशा पद्धतीचा विक्रम नोंदविण्यात आला.
विश्वविक्रमात सहभागी झालेली पथके
शंखनाद प्रतिष्ठान, गजलक्ष्मी ढोलताशा पथक, शिवमुद्रा ढोलताशा पथक, समर्थ प्रतिष्ठान, गजर ढोलताशा पथक, श्रीराम ढोलताशा पथक
महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा ही सर्वश्रुत आहे. मात्र रिले पद्धतीने ढोलताशा वादन करत विश्वविक्रम घडतो, हे लोकमतने संपूर्ण जगाला दाखविण्याचे काम केले आहे. लोकमतने स्तुत्य उपक्रम राबवून वादन कौशल्याला वाव दिलाच आहे, मात्र महाराष्ट्राची संस्कृती जगाच्या नकाशावर कोरण्याचे काम केले आहे. - अस्मिता जावडेकर, संचालिका, विलास जावडेकर डेव्हलपर्स
संस्कृतीला जगाच्या नकाशावर पोहचविण्याचे काम लोकमतच्या माध्यमातून झाले आहे. ढोलताशा आणि पुणे हे समीकरण कायम ओळखले जाते. त्यामुळे पारंपरिक वाद्य सातासमुद्रापार गेले आहे, मात्र विश्वविक्रमाच्या माध्यमातून जाणं खूप महत्त्वाचं होतं आणि तो विश्वविक्रम साध्य करण्यात पुणेकर वादक यशस्वी ठरले आहे. - उषा काकडे, संचालिका, ग्रॅव्हीटस फाउंडेशन