मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्यात भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यात अनेक जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतल्यानंतर त्यांच्यासोबत पक्षाचे ४० आमदार आणि १२ खासदार आले. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार आहेत. ही जागा लढवण्याची शिंदे गट आग्रही आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना यांच्यात बरेच वाद आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला. परंतु अद्यापही कुरबुरी सुरूच आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेंच उभे राहतील असा विश्वास मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. शंभुराज देसाई म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे कल्याणचे विद्यमान खासदार आहेत. शिवसेना-भाजपाचे २०२४ साठी एकमत आहे. ही जागा श्रीकांत शिंदेंच लढतील. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते खासदार होतील असं त्यांनी ठामपणे सांगितले.
परंतु ठाण्याची जागा शिवसेना लढवणार की भाजपाला सोडणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर ठोस उत्तर दिले नाही. जेव्हा आमचे नेते शिवसेनेच्या जागा किती लढायच्या, कोणत्या लढायच्या याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेण्याचा अधिकार दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र बसतील तेव्हा ४८ जागा कुणी कुठून लढायचा याबाबत जागावाटप ठरवतील. त्याप्रमाणे आम्ही शिवसेना-भाजपाच्या माध्यमातून सगळ्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करू असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं.
दरम्यान, चंद्रकांत खैरेंनी आमच्यावर टीका करण्याऐवजी २०२४ च्या निवडणुकीत ते कुठल्या चिन्हावर उभे राहणार आहेत त्याचा विचार करावा. आम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव, धनुष्यबाण चिन्ह दिले. काहीजण कोर्टात गेले परंतु कोर्टाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. आम्हाला आमचा पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरेंनी आधी त्यांचे चिन्ह ठरवावे, मूळात चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळणार आहे का याचाही त्यांनी विचार करावा, त्यानंतर ठाणे, कल्याण लोकसभेवर बोलावे असा टोला शंभुराज देसाईंनी लगावला आहे.