"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 06:15 PM2024-05-07T18:15:54+5:302024-05-07T18:17:21+5:30
Lok Sabha Election 2024 : पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना लोकसभेला होत आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर खुल्या व्यासपीठांवरून टीकाही करतात. या टीका राजकीय तसेच काही वैयक्तिक असल्याचे समोर आले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. या फुटीमुळे त्यांच्यात कौटुंबिक कलही निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्याच्या राजकारणावरही होताना दिसून येत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत आहे. पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना लोकसभेला होत आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर खुल्या व्यासपीठांवरून टीकाही करतात. या टीका राजकीय तसेच काही वैयक्तिक असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, माझे बंधू अखेरच्या काळात माझ्याकडे उपचार घेत होते. आता बोलणारे हे लोक एकदाही बघायला आले नव्हते, असे शरद पवार एका मुलाखतीत सांगितले होते. याला अजित पवारांनीही प्रत्युत्तर दिले आहे. "माझे वडील वारले, तेव्हा मी आणि माझा भाऊ लहान होतो. त्यामुळे ते त्यांच्याकडे उपचार करायला गेले असतील. १९७५ साली माझे वडील वारले. तेव्हा मी दहावीत वगैरे असेन. तुम्ही दहावीत असताना तुमच्या वडिलांना तुमचे काका घेऊन गेले असतील तर काकांवर तेवढा विश्वास पाहिजे ना. आपण गैरविश्वास दाखवू शकतो का?", असे अजित पवार म्हणाले.
अशावेळी तिथे एकदा घरातील प्रमुख व्यक्तीने त्यांना नेलं आहे. मग त्यात १५ वर्षांच्या मुलाने लुडबूड करण्याची काय गरज? असा प्रश्न विचारत माझ्या वडिलांना कोणता उपचार करायला बोलावलं होतं, हे साहेबांनी (शरद पवार) सांगावं? असाही सवाल अजित पवार यांनी विचारला. तसेच, माझ्या वडिलांना कोणता आजार झाला होता? कोणत्या आजाराकरता डॉक्टर किंवा कोणाकडून ट्रिटमेंट देत होतात, हेही सांगावं, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.