नांदेड : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपासोबत युती करण्यास शिवसेना अनुकूल आहे, परंतु जिल्ह्यात सेनेची ताकद अधिक असून, गरज पडल्यास स्वबळावर निवडणुका लढविल्या जातील, अशी माहिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली़
शिवसेना आणि भाजपामध्ये युती संदर्भात बैठकांचे सत्र सुरू आहे़ या बैठकांत सकारात्मक चर्चा झाली असून, देगलूर व हदगाव वगळता अन्य ठिकाणी जागा देण्याबाबत एकमत झाले आहे़ नांदेड जिल्हा परिषदेच्या ६३ जागांपैकी किमान ३५ जागांवर सेनेचा दावा राहणार आहे़ जिल्ह्यात भाजपापेक्षा सेनेची ताकद अधिक असून, चार आमदार आमच्या पक्षाचे आहेत़ युतीबाबत आमची भूमिका अनुकूल असली, तरी प्रसंगी स्वबळाचीही आमची तयारी असल्याचे पालकमंत्री खोतकर म्हणाले़