ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही, आणि तसा कोणताच निर्णय भारतात झालेला नाही असं सागत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदीची जबरदस्ती कशासाठी ? असा परखड सवाल विचारत रोखठोकपणे आपली मतं मांडली आहेत. सर्व राज्यांनी हिंदी शिकली पाहिजे ही जबरदस्ती का सुरु आहे ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. एबीपी माझाच्या "व्हिजन पुढच्या दशकाचं" या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
"हिंदीची जबरदस्ती कशासाठी ? हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही. तसा निर्णयही भारतात झालेला नाही. तर मग सर्व राज्यांनी हिंदी शिकली पाहिजे ही जबरदस्ती का सुरु आहे ?", असे एक ना अनेक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, "माझ्या वडिलांना व्याकरणासहित हिंदी यायचं, त्यांना उर्दूही यायचं. त्यामुळे मला भाषेबद्दल अनादर नाही". "मराठी भाषा वाढावी यासाठी आपल्या लेखक, कवींनी अथक प्रयत्न केले आहेत. ते का म्हणून व्यर्थ ठरवायचे आपण", अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.
बोलताना त्यांनी राज्य सरकारचा एक जीआर वाचून दाखवला ज्यामध्ये "लोकराज्य" मासिक हिंदी आणि गुजरातीमध्ये काढण्याची राज्य सरकारची तयारी सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. हिंदी आणि गुजराती भाषिकांसाठी हे मासिक काढण्यात येण्यावरुन राज ठाकरेंनी चांगलेच खडे बोल सुनावले. आपण मतांसाठी किती घरंघळत जाणार असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
यावेळी त्यांनी नागपूर खंडपीठालाही धारेवर धरत रिक्षा, टॅक्सी चालवणा-यांना मराठी आली नाही तरी चालेल हे ठरवणारं कोर्ट कोण ? असा सवाल विचारला. हिमाचल प्रदेशात बाहेरच्या व्यक्तीला जमीन विकली जात नाही हे त्यांनी आवर्जून नमूद केलं. कोणत्याही राज्याला सल्ला दिला जात नाही, पण महाराष्ट्राला सारखा सल्ला दिला जातो असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
"एका तरी राज्यात शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांच्याबद्दल शिकवलं जातं का ?", असा सवालही राज ठाकरेंनी विचारला. राज ठाकरे यांनी यावेळी बाहेरुन येणा-या लोंढ्यावरही टीका करत वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचं सांगितलं. "जे आधीच सरकार करायचं, तेच हे करतायत. काँग्रेस सरकार थापा मारायचं, पण हे सरकार आणखी थापा मारतं. कोणताही पैसा हातात नसताना फक्त घोषणा करायच्या", असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला.
राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांवरील आपली नाराजीही उघडपणे व्यक्त केली. "तीन वर्षापुर्वी जी शोध पत्रकारिता सुरु होती, ती आता का बंद झाली. जीएसटीनंतर गुजरात, सुरतमध्ये जे मोर्चे निघाले ते कोणी दाखवायला तयार नाही. आणीबाणीच्या वेळी संपादक, पत्रकार, साहित्यिकांनी ठाम भूमिका घेतली, पण आज ठाम भूमिका घेत का नाहीत?", अशी विचारणाही त्यांनी केली.
"पुढच्या 10 वर्षात महाराष्ट्राचं काय होणार हे कोणी वेगळं सांगायची गरज नाही", असा टोला राज ठाकरेंनी लगावला. "सर्व गोष्टी हवेत सुरु आहेत, मूळ विषय संपतील कसे याकडे कोणीही लक्ष देत नाही. पुढील 15 ते 20 वर्षात मराठवाड्याचं वाळवंट होईल. मराठवाड्याचा वाळवंट झाला तर परिस्थिती पुन्हा आहे तशी करण्यासाठी 150 वर्ष लागतील", असं राज ठाकरे बोलले आहेत.