दीप्ती देशमुख, मुंबईस्वत:ची कामवासना भागवण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत असतानाही पत्नीला तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणे, ही एक प्रकारची मानसिक क्रूरताच आहे, असा निर्वाळा देत वांद्रे कुटुंब न्यायालयाने एकाच छताखाली पाच वर्षे पतीबरोबर राहणाऱ्या पत्नीचा घटस्फोट मंजूर केला. पत्नीला पतीबरोबर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मात्र या केसमध्ये पतीने नेहमीच पत्नीचा अपमान केला आहे, असे निरीक्षण नोंदवत वांद्रे कुटुंब न्यायालयाने पालघर येथे राहणाऱ्या आॅल्विना डिसोझाचा (बदललेले नाव) घटस्फोट अर्ज मंजूर केला.आॅल्विना आणि जॉय (बदललेले नाव) यांचा विवाह २७ आॅक्टोबर १९९० रोजी झाला. या विवाह बंधनातून त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. मुलगी महाविद्यालयात तर मुलगा शिकत आहे.लग्नाचे सुरुवातीचे दिवस अतिशय चांगले गेले. मात्र काही दिवसांनी जॉयने खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली. जॉयला मद्यपान व धूम्रपानाचे व्यसन होते. मद्यधुंद अवस्थेत तो आॅल्विनाला नेहमी मारहाण करायचा. त्याने आॅल्विनाला जसलोक रुग्णालयातील नर्सची नोकरीही सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर आॅल्विनाचा जाच सुरू झाला. घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी आॅल्विनाला जॉयपुढे हातापाया पडावे लागे. त्याचबरोबर मद्यधुंद अवस्थेत घरी आलेला जॉय आॅल्विनाला शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करायचा. संबंध ठेवण्यास नकार दिला तर मुलांसमोर मारहाण व शिवीगाळ करायचा, असे आॅल्विनाने घटस्फोट अर्जात म्हटले आहे.जॉयने कधीच वैवाहिक कर्तव्ये पार पाडली नाहीत. उलट त्याच्यामुळे आपल्याला बाहेरच्यांकडून अपमान सहन करावा लागला. पाच वर्षे आम्ही एकाच छताखाली राहत आहोत, मात्र आमच्यात कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध नाही किंवा एकमेकांचा सहवासही नाही. त्यामुळे न्यायालयाने घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी आॅल्विनाने अर्जाद्वारे केली. ‘स्वत:ची कामवासना भागवण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत असताना पत्नीला तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणे, ही एक मानसिक क्रूरताच आहे,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. - ‘पाच वर्षे जरी याचिकाकर्ती (आॅल्विना) आणि प्रतिवादी (जॉय) एकाच छताखाली राहात असले, तरी याचा अर्थ ते एकमेकांच्या सहवासात आहेत, असा होत नाही. ते शरीराने एकत्र आहेत, मात्र मनाने एकमेकांपासून फार दूर आहेत. ते पाच वर्षे एकत्र राहत असले तरी त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध आलेले नाहीत. या काळात प्रतिवाद्याने जाणुनबुजून कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यास चुकारपणा केला आहे. घरापासून वारंवार दूर राहणे, यावरून प्रतिवादी वैवाहिक कर्तव्ये पार पाडण्यापासून पळत आहे, हे स्पष्ट होते,’ असे म्हणत वांद्रे कुटुंब न्यायालयाने आॅल्विनाला दरमहा २५ हजार रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश जॉयला दिले. तसेच मुलांचा शैक्षणिक खर्च व घरखर्च करण्याचाही आदेश दिला.
दारूच्या नशेत शारीरिक संबंधाची बळजबरी करणे म्हणजे क्रूरताच - न्यायालय
By admin | Published: October 11, 2015 2:06 AM