ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - विद्यार्थ्यांनी ड्रेस कोडचे पालन केले नाही यासाठी शिक्षा म्हणून त्यांचे केस जबरदस्तीनं कापण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळी येथील हा धक्कादायक प्रकार आहे. एक शिक्षक आणि शाळा संचालकानं 25 विद्यार्थ्यांचे केस जबरदस्तीनं कापल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिक्षक, संचालकासहीत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार केली, ज्यानंतर आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतर्फे इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना छोटे केस ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी शाळेतील प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची तपासणी सुरू असताना यातील 25 विद्यार्थ्यांचे केस मोठे असल्याचे आढळले. यावेळी शिक्षक आणि संचालकांनी या विद्यार्थ्यांना केस छोटे न केल्यानं शिक्षा केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शाळा संचालक गणेश बाटा, शिक्षक मिलिंद जानके आणि कार्यालय सहाय्यक तुषार गोरे यांनी नियमांचं पालन न करणा-या विद्यार्थ्यांनी धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
यावेळी तिघांनी 25 विद्यार्थ्यांचे कथित स्वरुपात केस जबरदस्तीनं कापल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान, दोन विद्यार्थी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. विक्रोळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर हनचटे यांनी सांगितले की, आम्ही तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे.