सोपान पांढरीपांडे,
नागपूर- आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी फोर्ड इंडिया प्रा. लि.ने (एफआयपीएल) कार आणि इंजिनसाठी भारताला जागतिक निर्यात तळ (निर्यात हब) बनविल्याची माहिती ‘एफआयपीएल’चे व्यवस्थापकीय संचालक (विपणन, विक्री व सेवा) अनुराग मेहरोत्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मेहरोत्रा म्हणाले, ‘फोर्डने कारच्या जोडणीसाठी दोन उत्पादन प्रकल्प आणि इंजिनच्या उत्पादनासाठी चेन्नईजवळ चेनगलपट्ट व गुजरातेतील सानंद येथे प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांची एकूण क्षमता ४.४० लाख कार आणि ६.४० लाख इंजिननिर्मितीची आहे. गेल्या वर्षी फोर्ड इंडियाने जवळपास २.४० लाख कारची निर्मिती केली. त्यापैकी १.५० लाख कार जगात ५०पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केल्या आहेत. देशांतर्गत बाजारात ८५ हजार कारची विक्री केली,’ असे मेहरोत्रा यांनी स्पष्ट केले. फोर्डचे दोन्ही प्रकल्प अद्ययावत असून, फोर्डचे संस्थापक हेन्री फोर्ड यांच्या जगात प्रसिद्ध असेम्ब्ली लाइन्स डिझाइननुसार उभारले आहेत. एका तासात ६० कार अर्थात, दर मिनिटाला एका कारची निर्मिती या प्रकल्पात होते.मेहारोत्रा म्हणाले, प्रत्येक श्रेणीत फोर्डची गाडी उपलब्ध आहे. हॅचबॅकमध्ये फिगो, मध्यम वर्गवारीत सेडन अॅस्पायर आणि स्पोर्ट युटिलिटीमध्ये इकोस्पोर्ट आणि इंडेव्हर कार आहेत. आमच्या महसुलात इकोस्पोर्टचा वाटा ५० टक्के आहे. फोर्ड इंडियाकडून एक ते पाच लीटर क्षमतेच्या इंजिनचे उत्पादन केले जाते व त्यात इंधन कार्यक्षमतेचा विकास व नियंत्रित कार्बन उत्सर्जनावर भर देण्यात येतो. त्यामुळे फोर्ड कार ग्राहकोपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. फोर्डची मस्टांग ही कार पाच लीटर, आठ सिलिंडर इंजिनची असून, कारची गती ताशी ३०० कि़मी. एवढी आहे. या कारची किंमत ६५ लाख आहे. भारतातील स्पोर्ट कारप्रेमींकडून मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.फोर्ड इंडिया महाराष्ट्रात युनिट स्थापन करणार आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात मेहरोत्रा म्हणाले, चेनगलपट्टू आणि सानंद येथील प्रकल्प आपल्या एकूण क्षमतेपेक्षा अर्ध्या क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे नवीन युनिट सुरू करण्याची शक्यता नाही. याशिवाय फोर्ड ओईएम सप्लायरचे या प्रकल्पांजवळ लहान युनिट्स आहेत. त्यामुळे नवीन ठिकाणी आम्ही का जाऊ, असा प्रतिसवाल त्यांनी केला. इथेनॉल इंजिनच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अमेरिका आणि चीनमध्ये दमदार पेट्रोल इंजिनला तर भारतात दोन लीटरपेक्षा कमी क्षमतेच्या इंधन इंजिनला प्राधान्य दिले जाते, पण सरकारने इंजिनवर स्पष्ट धोरण आणले, तर फोर्ड निश्चितच इथेनॉल इंजिनचा विचार करेल. केंद्र सरकार १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडणार आहे. यापासून आॅटोमोबाइल क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. प्राप्तिकराच्या टप्प्यात वाढ आणि दोन लीटरपेक्षा कमी इंजिनवरील उत्पादन शुल्कात घट केल्यास कारच्या विक्रीत निश्चितच वाढ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. फोर्ड इंडियाने फोर्डची मस्टांग ही आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आरामदायक स्पार्ट कार संपूर्ण बिल्ट युनिट प्रकारात (सीबीयू) आयात करण्यास सुरुवात केली. ही कार पाच लीटर, आठ सिलिंडर इंजिनची असून, कारची गती ताशी ३०० कि़मी. एवढी आहे. या कारची किंमत ६५ लाख आहे. भारतातील स्पोर्ट कारप्रेमींकडून मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.