शशी करपे / वसईवसई तालुक्याला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, पर्यटकांनी किनारे अस्वच्छ केले आहेत. मात्र, वसईची एक परदेशी सून मात्र गेल्या महिनाभरापासून पती आणि छोट्या मुलीसोबत दर रविवारी रानगावच्या समुद्रकिनाऱ्यावरील कचरा गोळा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावीत आहे. परदेशी सुनेने वसईकरांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठीच हे पाऊल उचलले आहे. हंगेरीच्या सुझसान्ना यांचा पाच वर्षांपूर्वी वसईतील लिस्बन फेराओ यांच्याशी प्रेमविवाह झाला. त्या वसईत स्थायिक झाल्या आहेत. त्यांना मुलगी आहे. सुझसान्ना फेराओ यांना समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याची आवड होती पण हंगेरीत समुद्र नसल्याने त्यांना वसईत आल्यावर ती हौस भागवता आली आहे. वसईतील सुंदर किनाऱ्यांनी त्यांना आकर्षित केले आहे. त्या आपले पती आणि मुलीसोबत रानगाव समुद्रकिनारी दर रविवारी फिरायला येतात. मात्र, येणाऱ्या पर्यटकांनी किनारे अस्वच्छ केले आहेत. ठिकठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्या. प्लॅस्टिकचा कचरा यासह विविध प्रकारच्या कचऱ्याचे ढीग किनाऱ्यावर पडलेले दिसतात. अस्वच्छ किनाऱ्यांमुळे फिरण्याची मजा लुटता येत नसल्याने यांनी समुद्रकिनाऱ्यावर असलेला कचरा पिशवीत गोळा करून योग्य त्याठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याचा विचार सुचला. तसे त्यांनी लिस्बन यांना बोलून दाखवले. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून सुझसान्ना आणि लिस्बन रानगाव किनाऱ्यावर असलेला कचरा पिशवीत गोळा करून नेत आहेत. किनारा स्वच्छतेत त्यांची चिमुकलीदेखिल त्यांना मदत करीत असते. एक परदेशी महिला आपल्या चिमुकलीसह किनाऱ्यावर पडलेला कचरा गोळा करताना पाहून पर्यटक आणि स्थानिकांनाही कुतुहल वाटू लागले आहे. त्यांच्या स्वच्छता मोहिमेत कधी तरी स्थानिकांचे दोन चार हात मदतीला येत असतात. आपण ज्याठिकाणी मुलांसोबत खेळतो, बागडतो, मौज मस्ती करतो तो परिसर स्वच्छ असावा असे त्यांना वाटते. निसर्ग टिकवून ठेवण्यासाठी स्वच्छता राखली पाहिजे असेही त्या सांगतात. स्वच्छतेत आपण खारीचा वाटा उचलत आहोत. पर्यटकांनी स्वच्छता करावी असे म्हणणे नाही. पण, किमान किनाऱ्यावर कचरा टाकू नये अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. फिरण्यासोबत आपण किनाऱ्यावरील कचरा उचलत राहणार असेही त्या सांगतात. त्यांच्या स्वच्छतेचा धडा वसईकर आणि पर्यटक नक्कीच गिरवून वसई तालुक्यातील समुद्रकिनारे सुंदर आणि स्वच्छ ठेवतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
विदेशी बहू साफ करते समुद्रकिनारा
By admin | Published: April 24, 2017 11:47 PM