ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २१ - सध्याचे देशाभोवतीचे चित्र पाहता संरक्षण खात्यासाठी शंभर टक्के परदेशी गुंतवणुकीस परवानगीचा निर्णय चिंताजनक असल्याचे मत माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पुण्यात साखर संकुल येथे साखर कामगाराच्या मागण्याच्या बैठकीसाठी आले असताना ते बोलत होते.
पवार म्हणाले, ‘‘ परदेशी गुंतवणूक झाल्यास देशाचा फायदाच होतो. मात्र, संरक्षण, नागरी विमान वाहतूक या क्षेत्रांत शंभर टक्के परदेशी गुंतवणुकीस परवानगी देणे चुकीचे आहे. सभोवतालचे देश या निर्णयाचा गैरफायदा घेण्याची भीती आहे.’’
रघुराम राजन यांना घालविण्यासाठीच भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर हल्ले केले. ते पुन्हा दुसरी टर्म स्वीकारणार नाहीत, असे वातावर तयार केल्याचा आरोपही पवार यांनी केला. ते म्हणाले, ‘‘ रिझर्व्ह बॅँकेच्या गव्हर्नरचा विषय देशात कधीही चर्चेचा झाला नव्हता. मात्र, भाजपच्या आमदार-खासदारांनी त्यांच्यावर टीका केली. त्यामुळेच दुसºया टर्मला राजन नको म्हणाले.’’
आघाडीच्या काळात दिल्या गेलेल्या भूखंडांची श्वेतपत्रिका सरकारने नक्की काढावी. मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ असेल तर चौकशीही करावी, असे आव्हानही पवार यांनी दिले. आम्ही संस्थांनाच भूखंड दिले आहेत, असे ते म्हणाले,
मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना दिलेल्या ‘क्लिन चिट’वर टीका करताना पवार म्हणाले, ‘‘ कदाचित सरकारने चौकशी समिती कोणाची नेमायची हे अगोदरच ठरविले असेल. त्याच्या अहवालाबाबतही चर्चा झाली असेल. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी चौकशीच्या अगोदरच क्लिन चिट दिले आहे. ’’
दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआय सारखी संस्था खालात जाऊन तपास करत आहे. त्यातून काही गंभीर बाबी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.
साखर कारखान्यात काम करणा-या कामगाराचा करार संपला आहे.साखर संघ आणि कामगार संघटना यांच्यात बैठक झाली. मात्र, त्यामध्ये एकवाक्यता झाली नाही. दोन्ही बाजुंनी माझ्यावर जबाबदारी टाकली असल्याचे पवार यांनी सांगितले.