नागपूर - परदेशी माध्यमे भारताची विकसित देशाकडे होणारी वाटचाल रोखण्याचा प्रयत्न करतंय. कुणी असा प्रपोगेंडा बनवत आहे का? मोदींच्या नेतृत्वात जगात आर्थिकदृष्ट्या ५ व्या नंबरवर भारत आहे हे अन्य कुणाला बघवत नाही. भारताने कोरोना लस उत्पादित कशी केली? ६० कोटी लोकांना वर्षाला आरोग्य सुविधा मोफत कशी दिली जाते? डिजिटल युगाकडे भारत जातोय. हे सत्य आहे जे काही देशांना पाहावत नाही. जे सत्य आहे ते समोर येणारच आहे. यामागे नेमकं काय चाललंय हे समजून घ्यायला हवं असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी मांडले.
मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वोच्च न्यायालयापासून देशातील कनिष्ठ न्यायालयानं एखाद्या प्रकरणावर निकाल दिला असताना जुन्या बातम्या काढून आजही प्रश्न उपस्थित केले जाते. विश्वासार्हता कुणाची राहिली? एक अजेंडा बनवून चॅनेल काम करते. देशातील राजधानीत देशाचे तुकडे करणाऱ्यांना हिरो बनवले गेले. भारताचे तुकडे करण्याचे नारे जिथे लागत होते. तिथे दिग्गज नेते त्यांच्यासोबत उभे राहायचे. लोकांपर्यंत बातमी पोहचवण्याचं केवळ वृत्तपत्र, चॅनेल एकच माध्यम नाही. तर डिजिटल माध्यमेही आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच सत्य काय आणि खोटे काय हे फॅक्टचेक करण्याचं काम सरकारकडून पीआयबीच्या माध्यमातून केले जाते. माध्यमांमधूनही फॅक्टचेक होऊ लागले. काही राजकीय पक्ष जनतेच्या विकासासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा गुणगान गाण्यासाठी निधी ठेवतात. संसदेचा आधार घेत भारताच्या पंतप्रधान यांच्याविरोधात अपशब्द वापरले जातात. २०१६ मध्ये मोदींच्या डिग्रीबद्दल सर्व खुलासा केला असताना २०२३ मध्ये हा प्रश्न विचारणाऱ्यांना माध्यमांनी सवाल उपस्थित का केला नाही. माध्यमांनी रिसर्च करणे बंद केले का? सोशल मीडियात जुने रेकॉर्ड टाकले जातात. माध्यमांची भूमिका सोशल मीडियात निभावते असं मंत्री ठाकूर यांनी सांगितले. लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.
दरम्यान, इंदिरा गांधींच्या आणीबाणीसारखी परिस्थिती नाही. नवी आव्हाने उभी आहेत. माध्यमे समाजाचा आरसा आहेत. परंतु हा आरसा साफ ठेवणे पत्रकारांची जबाबदारी आहे. ६० वर्षात शिक्षण प्रणाली कशी होती. अघोषित माध्यमांवर दबाव कसा होता. भारतीय विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्यांना जाणुनबुजून बाजूला ठेवले. एकच बाजू शिकवली जायची. दुसऱ्या बाजूचे ज्ञान दिले जात नव्हते. देशातील माध्यमे वेळेनुसार बदलत आहे. ग्राहकांना काय हवं त्यावर निर्भर आहे. रेटिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मीडिया ट्रायलनं नुकसान कुणाचे होते? ७५ वर्षात देशात सरकार कुणाचेही असो माध्यमांनी तर्क आणि बातम्या देण्याचं काम केले. यापुढच्या काळातही माध्यमे त्यांची भूमिका निभावतील. मतभेद, मनभेद असतील परंतु क्षमतेची कुठलीही कमी माध्यमांमध्ये नसेल. जे विकू शकेल तीच बातमी आहे असं माध्यमांच्या कार्यालयात म्हटलं जाते. याला जबाबदार कोण? माध्यमांमध्ये अनेक उद्योगपतींचा पैसा लागलाय त्यामुळे हे असू शकते. आता या आव्हानांमधून बाहेर पडण्याचं काम पत्रकारांना करावे लागणार आहे. नव्या आव्हानात गुण-दोष दोन्ही पाहायला हवेत असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.
राहुल गांधींना टोलास्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करण्याचं काम देशातील मोठ्या घराण्यात जन्माला आलेला नेता करतो. सावरकर बनण्यासाठी त्याग करावा लागतो. तप करावं लागते. जेलमध्ये जावं लागते. मी सावरकर नाही असं म्हणता, तुम्ही सावरकर बनूच शकत नाही. जर तुम्हाला एखाद्याचा सन्मान करता येत नाही अपमान करू नका असा टोला मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना लगावला.