राजीव नेवासेकर
बोर्ली-मांडला :
गिधाडांच्या संवर्धनासाठी फणसाड अभयारण्यात वनविभागाने गेल्या वर्षी उभारलेला ‘व्हल्चर रेस्टॉरंट’ हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. येथे मेजवानीसाठी परिसरातील गिधाडे येतात. विशेष म्हणजे, या ठिकाणी गेल्या आठवड्यात इजिप्शियन सोनेरी रंगाची, काळ्या मानेची गिधाडे वनाधिकाऱ्यांना दिसली.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच थंडीची चाहूल लागताच खाडी व समुद्रकिनारी स्थलांतरित परदेशी पक्षी येतात. फणसाड अभयारण्यात प्रथमच हे परदेशी गिधाड दिसले. गेल्यावर्षी सुपेगाव परिसरातील फणसाड वन्यजीव संरक्षक अभयारण्यात व्हल्चर रेस्टॉरंट उभारले. या रेस्टॉरंटमध्ये येथील वनाधिकारी व वनरक्षक मुरूड तालुक्यासह अन्य परिसरातील मृत जनावरांना आणून टाकतात. हे गिधाडांचे प्रमुख अन्न आहे. ते खाण्यासाठी या परिसरातील गिधाडे आता येत आहेत; परंतु, आता त्यात परदेशी पाहुणेही येत आहेत. वनविभागाने या रेस्टॉरंटमध्ये दोन दिवसांपूर्वी इजिप्शियन सोनेरी गिधाडे ताव मारताना वन अधिकाऱ्यांना दिसली. सहायक वनसंरक्षक नंदकिशोर कुप्ते यांनी दुजोरा दिला.
सामाजिक संस्थांचाही मदतीचा हात फणसाड अभयारण्यातील वनसंपदा व पशु-पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था मदत करीत असून, ग्रीन वर्क ट्रस्ट ही एक संस्थादेखील गिधाड प्रजातीच्या रक्षण व संवर्धनासाठी येथे काम करीत आहे. त्यामुळे येथे नष्ट होत चाललेल्या गिधाडांच्या संख्येत वाढ होत आहे. आता तर परदेशी गिधाडे ही फणसाड अभयारण्यात घिरट्या घालू लागली आहेत.
1. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे शेती क्षेत्र घटले आहे. तसेच आधुनिक यंत्रसामग्रीचा शेतीत वापर वाढल्याने शेतकरी जनावरे अर्थात गाई-म्हशी पाळण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने घटले आहे. 2. जनावरांचे मांस हे गिधाडांचे अन्न. तेच कमी होत असल्याने गिधाडांचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन ही गरज बनली. याच हेतूने वनविभागाने येथील फणसाड अभयारण्यात व्हल्चर रेस्टॉरंट ही संकल्पना राबवली आहे.