औरंगाबाद : आपण मोठा अधिकारी आहोत, त्यामुळे नियम तोडला तरी कोणीही माझे वाकडे करू शकत नाही, वाहतूक पोलीस हा आपल्यासमोर किरकोळ माणूस आहे, अशा आविर्भावात भर चौकात वाहन अडविणाऱ्या वाहतूक पोलिसाला वन खात्याच्या अधिकारी आणि त्यांच्या चालकाने शिवीगाळ करीत झटापट केल्याने खळबळ उडाली आहे. बसस्थानक रोडवरील कार्तिकी हॉटेल वाहतूक सिग्नल येथे सोमवारी दुपारी १२.२५ वाजेच्या सुमारास ही घटना झाली. या घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह त्याच्या वाहनचालकास अटक केली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी लिमचंद राठोड (५७,रा. समर्थनगर) आणि चालक अनिल चव्हाण (४०, रा.पाटणादेवी, ता. चाळीसगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी पोलिसांनी सांगितले की, शहर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक कॉन्स्टेबल लक्ष्मण धोटे आणि पोलीस हवालदार कल्याण हिवाळे हे सोमवारी सकाळी ९ वाजता कार्तिकी हॉटेल वाहतूक सिग्नल येथे कामावर होते. यावेळी महावीर चौकाकडून (बाबा पेट्रोल पंप) बसस्थानकाकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ जीप (क्रमांक एमएच-१९ बीजे ५८४५) चालकाने सिग्नल तोडून चौकातच आपले वाहन उभे केल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे पो.कॉ. धोटे यांनी चालक चव्हाण यास जीप बाजूला घेऊन मोटारवाहन कायद्यानुसार पावती घेण्याचे सांगितले.
त्यावेळी जीपमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड बसलेले होते. त्यांनी गाडीतूनच धोटे यांना उद्देशून हातवारे करीत ह्यतू बाजूला सरकह्ण असे म्हणून शिवीगाळ सुरू केली. धोटे यांनी राठोड यांना खाली उतरण्याचे सांगितले. तेव्हा राठोड अधिकच संतप्त झाले. त्यांनी दोन्ही पोलिसांना अर्वाच्य भाषेत ह्यतिकडे चोर चालले व तुम्ही आम्हाला काय पकडता? मी एक रुपयाचा दंड न भरता तुम्हा दोघांना उठबशा मारायला लावतो, मी मोठा अधिकारी असून तुम्हा दोघांना बघून घेतो, तुमचे नाव व नंबर सांगा, तुम्हाला काय करायचे ते कराह्ण अशी धमकीच दिली. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ वाहतूक नियंत्रण कक्षाला कळवली. या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बिरारी हे अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राठोड आणि चव्हाण यांना ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलीस ठाण्यात नेले.परीक्षेत्र अधिकाऱ्यास अटकपो.कॉ.धोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राठोड आणि चव्हाण यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व झटापट करून जिवे मारण्याची धमकी देणे या कलमांखाली आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड आणि चालक चव्हाण यांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.