मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीच्या इन्फिनिटी आयटी पार्क लगत असलेल्या गिरीकुंज सोसायटी, इमारत क्रमांक 5 ते इमारत क्रमांक 8 च्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीवरून बिबट्याचा काल दिवसा ढवळ्या मुक्त संचार होता. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.गेली तीन चार दिवस बिबट्या मध्यरात्री कुत्र्याची शिकार करण्यासाठी येत होता.
काल 'लोकमत ऑनलाईन'वर ब्रेक झालेली सदर बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि याबाबत आज लोकमतच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. तर दुपारी शिकार केलेल्या कुत्र्याला बिबट्या संरक्षक भिंतीवरून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांना सदर प्रतिनिधीने आणि गिरीकुंज सोसायटीच्या रहिवासी डॉ.रामेश्वरी पाटील यांनी माहिती दिली. आमदार सुनील प्रभू यांनी लगेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे आणि वन विभागाच्या सचिवांशी आणि ठाणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि मग शासकीय यंत्रणा व वन विभागाने तत्परता दाखवत कामाला लागली. काल रात्री ठाणे वन विभागाचे वन अधिकारी रामराव यांनी 10 वाजता या सोसायटीत त्यांचे पथक पाठवले अशी माहिती डॉ.रामेश्वरी पाटील यांनी दिली.
आज (बुधवारी) वन खात्याचे अधिकारी येथे आले होते आणि बिबट्याच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी वन खात्याने येथे कॅमेरा लावला आहे. उद्या सकाळी ११ वाजता वनविभागाचे अधिकारी गिरीकुंज सोसायटीत येणार असून, बिबट्यापासून काळजी कशी घ्यायची याचे मार्गदर्शन येथील नागरिकांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच येथील सोसायटीच्या मागील बाजूस असलेली संरक्षक भिंतीची उंची वाढवून त्यावर तारेचे कुंपण घालण्यासाठी वन खात्याने येथील एका खाजगी बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच बिबट्या येथील संरक्षक भिंतीला असलेल्या झाडावरून उडी मारून येथील आवारात येत असल्याने येथील गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंती लगत असलेल्या मोठ्या झाडांची छाटणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रामेश्वरी पाटील यांनी दिली.