मुंबई - गेल्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटली होती. त्यानंतर दोन्ही पक्ष राज्य आणि केंद्रात एकत्र असले तरी त्यांच्यात तीव्र मनभेद निर्माण झाले होते. मात्र आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्षअमित शहा यांनी गळाभेट घेत युतीमधील दुरावा संपुष्टात आणला. यावेळी शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती व्हावी, अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे. शिवसेना हा भाजपाचा सर्वात जुना मित्र आहे. काही कारणांमुळे आपल्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र तो दुरावा आज या क्षणापासून विसरा आणि एकजूट होऊन कामाला लागा, असे आवाहन अमित शहा यांनी केले. शिवसेना आणि भाजपाची युती निश्चित झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाध्यक्ष अमित शाह नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी अमित शहा म्हणाले की''शिवसेना आणि भाजपा युती व्हावी अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली आहे. शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. गेल्या काही काळात आमच्यात मतभेद होऊन काही दुरावा निर्माण झाला होता. मात्र जो काही दुरावा होता तो आज इथे संपुष्टात आणा.'' अमित शहा पुढे म्हणाले की, ''भाजपा आणि शिवसेनेमधील युती ही केवळ राजकीय नाही तर वैचारिक पार्श्वभूमीवर आधारलेली आहे. गेल्या पाच वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात एनडीएचे सरकार आहे. त्यात शिवसेना सहभागी आहे. केंद्रात मोदींनी चांगले काम केले आहे. तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चांगले काम केले आहे. आता दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आणि कार्यकर्ते एकजूट होऊन लढतील आणि विजयी होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दुरावा विसरा, एकजुटीने कामाला लागा, अमित शाह यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 8:55 PM