मुंबई - राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे अर्थात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ घातले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहे. मात्र चर्चा त्यांच्या शपथविधीच्या आमंत्रण पत्रिकेचीच सुरू झाली आहे. उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिले आहे.
याआधी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा रात्री उशिरा निर्णय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी सकाळीच भाजपसोबत जावून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारला होता. त्यांना राज्यापालांनी शपथ दिली होती. मात्र हा शपथविधी सर्वांना गाफील ठेवून उरकण्यात आला होता.
अर्थात या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील आमदारही बोलवले नव्हते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनाही आमंत्रण दिले नव्हते. मात्र उद्धव ठाकरे यांनी न विसरता नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिले आहे. त्यामुळे फडणवीस शपथविधीच्या वेळी पंतप्रधान मोदींना विसरले असले तरी उद्धव ठाकरे विसरले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.