पुणे :रस्त्यात पडलेला रुपयासुद्धा परत मिळत नाही असे कलियुग आले असताना पुण्यातल्या रिक्षाचालकाने मात्र वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पॅसेंजरच्या विसरलेल्या पिशवीत असलेले तब्बल पाच लाख रुपये संबंधित व्यक्तीच्या घरी पोहोचवण्याची आदर्श कृती मारुती वाघमारे या रिक्षाचालकाने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की व्यवसायाने व्यापारी असणारे प्रकाश करमचंदनी (वय ७२) यांनी मार्केट यार्ड भागातून एन आय बी एम रस्ता कोंढवा येथील आपल्या घरापर्यंत वाघमारे यांची रिक्षा केली. घाईत घरी उतरल्यावर त्यांना आपली पैशांची पिशवी रिक्षात राहिल्याचे आठवले. त्या संदर्भात त्यांनी तातडीने कोंढवा पोलीस स्टेशनला तक्रारही नोंदवली. मात्र तक्रार नोंदवून घरे पोचेपर्यंत वाघमारे यांनी पैशांची पिशवी घरी आणून दिली होती. दुसरीकडे वाघमारे यांनी करमचंदानी यांना सोडवून रिक्षा पेट्रोल पंपावर नेली. त्यावेळी त्यांना मागच्या सीटवर पैशांची पिशवी दिसली. त्यांनी ताबडतोब ते पैसे मूळ मालकाच्या घरी जाऊन परत केले. याबाबत कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी वाघमारेंचे विशेष कौतुक केले असून त्यांचा सत्कारही केला.