युती सरकारच्या काळातच शिवसेनेने दिला होता प्रस्ताव; अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 08:36 AM2022-09-29T08:36:02+5:302022-09-29T08:42:35+5:30

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा युतीनं एकत्रितपणे प्रचार करत लोकांना युतीसाठी मते मागितली. परंतु निवडणूक निकालात भाजपाच्या पूर्वीपेक्षा कमी झालेल्या जागा पाहून शिवसेनेने राजकीय खेळी खेळली.

Form Government the proposal was made by Shiv Sena during the coalition government; Ashok Chavan's secret explosion | युती सरकारच्या काळातच शिवसेनेने दिला होता प्रस्ताव; अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

युती सरकारच्या काळातच शिवसेनेने दिला होता प्रस्ताव; अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

Next

मुंबई - राज्यातील राजकारणात २०१९ मध्ये ऐतिहासिक उलथापालथ पाहायला मिळाली. मुख्यमंत्रिपदावरून भाजपाशी वितुष्ट आल्यानंतर शिवसेनेने थेट विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाविकास आघाडी तयार केली. मविआनं २०१९ मध्ये राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. परंतु ही आघाडी २०१४-२०१९ या काळातच होणार होती असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. 

अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची होती असा खुलासा त्यांनी केला. तसेच याप्रकारचं सरकार स्थापन करायचं असेल तर तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असं मी शिवसेना नेत्यांना म्हटलं. परंतु ते पवारांना भेटले नाहीत त्यांचे पुढे काय झालं याबाबत माहिती नाही असंही चव्हाणांनी स्पष्ट केले. 'लोकसत्ता'नं याबाबत वृत्त दिले आहे. 

....अन् महाविकास आघाडी जन्माला आली
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा युतीनं एकत्रितपणे प्रचार करत लोकांना युतीसाठी मते मागितली. परंतु निवडणूक निकालात भाजपाच्या पूर्वीपेक्षा कमी झालेल्या जागा पाहून शिवसेनेने राजकीय खेळी खेळली. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद शिवसेना देऊ असा शब्द भाजपानं दिला होता. याच मुख्यमंत्रिपदाच्या वादावरून शिवसेना-भाजपा यांच्यात बिनसलं. त्यानंतर शिवसेनेने विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात ऐतिहासिक महाविकास आघाडी जन्माला आली. 

मविआ सरकारच्या माध्यमातून शिवसेनेने मुख्यमंत्रिपद मिळवलं तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तेत सहभागी होणे पसंत केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं असं शरद पवारांनी म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ठाकरे घराण्यातील पहिलाच व्यक्ती सत्तेच्या केंद्रस्थानी आला. मात्र आता अशोक चव्हाणांनी जे विधान केले त्यावरून शिवसेनेने २०१९ च्या आधीपासूनच ही राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. चव्हाणांच्या या विधानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 
 

Web Title: Form Government the proposal was made by Shiv Sena during the coalition government; Ashok Chavan's secret explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.