मुंबई - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला २ जबर धक्के बसत आहेत. माजी खासदार आणि आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केले आहे. गोंदिया इथले माजी आमदार गोपाल अग्रवाल आणि नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे लवकरच समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. खतगावकर हे अशोक चव्हाणांचे नातेवाईक असल्यानं त्यांच्यासाठीही हा धक्का मानला जात आहे.
आज गोंदिया येथे काँग्रेसच्या कार्यक्रमात माजी आमदार गोपाल अग्रवाल यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. गोपाल अग्रवाल हे २ वेळा विधान परिषद आणि ३ वेळा विधानसभेचे आमदार राहिले आहेत. गोपाल अग्रवाल यांनी भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने गोंदिया जिल्ह्यातील कामे मार्गी न लावल्याचा आरोप गोपाल अग्रवाल यांनी केला आहे. अग्रवाल यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचे दाजी माजी खासदार भास्करराव खतगावकर हेदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपाचा पराभव झाला. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर भास्करराव खतगावकर, त्यांच्या सुनबाई मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी भाजपाचे कमळ हाती घेतले तरीही नांदेडमध्ये काँग्रेस खासदार निवडून आले.
दरम्यान, अशोक चव्हाणांना खूप मोठी संधी भाजपात मिळेल. मोदी सरकार आल्यावर ते मंत्री होतील. त्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचा विकास होईल या हेतूने मी त्यांना पाठिंबा दिला. जी परिस्थिती भाजपात आज अशोक चव्हाणांची आहे त्यातून आमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. मतदारसंघाच्या विकासासाठी मला मीनलच्या माध्यमातून लोकांचा विकास करायचा आहे. नायगावची विधानसभा मीनल खतगावकर यांनी लढवावी आणि रवींद्र चव्हाणांनी लोकसभा लढवावी असा निर्णय आमच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय असं माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी सांगितले.