ठाणे: जम्मू काश्मीरमधून रद्द करण्यात आलेल्या कलम 370 निमित्त नवी मुंबईत भाजपाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या उपस्थित होते. मात्र त्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम त्यांनी व्यासपीठ आणि खुर्च्या यांच्यामध्ये असलेल्या पायऱ्यांजवळ बसून पाहिला. ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात आज मानापमान नाट्य रंगलेले पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर माजी खासदार भाजपचे ठाणे जिल्हा प्रभारी किरीट सोमय्या यांनीही व्यासपीठावर जागा न मिळाल्याने त्यांनी थेट सभागृहातील व्हरांड्यातच बसकण मारली. सोमय्या यांनी व्यासपीठाच्या पायऱ्यांजवळ बसून संपूर्ण कार्यक्रम पाहिला.केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या जाहीर भाषणाचा कार्यक्रम आज ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी हे मानापमान नाट्य रंगले. तोंडदेखलेपणासाठी सूत्र संचालन करणाऱ्या निवेदकाने गणेश नाईक यांचा आज वाढदिवस असल्याने ते पुढील कार्यक्रासाठी निघून गेल्याचे सांगितले. तर अनेक विनवण्या करूनही सोमय्या व्यासपीठावर येत नसल्याचे पाहून चक्क शो मस्ट गो ऑन म्हणत कार्यक्रम पुढे रेटला. त्यामुळे भाजपमध्ये आयाराम आणि प्रस्थापित अशा गटबाजीची नांदी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, यासंदर्भात भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. तर किरीट सोमय्या यांनीही यावर बोलण्यास नकार दिला.
भाजपाच्या व्यासपीठावर किरीट सोमय्यांना जागा नाही; खाली बसून पाहिला कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 9:25 PM