ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अंतुले हे उत्तम प्रशासक व धडाडीचे निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जात होते.
अब्दुल रेहमान अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी रायगड जिल्ह्यात झाला होता. कला शाखेत पदवी घेतल्यावर अंतुले यांनी कायद्याचीही पदवी घेतली होती. १९४५ पासून अंतुले यांनी सामाजिक कार्यात सक्रीय झाले. १९६२ ते १९७६ या कालावधीत ते आमदार म्हणूनही निवडून आले. या कालावधीत त्यांनी न्याय, सार्वजनिक बांधकाम अशा विविध खात्यांचे कामकाज पाहिले. गांधी घराण्याचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. १९७६ मध्ये ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. आणीबाणीच्या काळात राज्यसभेत त्यांनी खंबीरपणे इंदिरा गांधी यांची पाठराखण केली होती. १९८० साली राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले व अंतुले यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली. धडाडीचे आणि झटपट निर्णय व उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी अल्पावधीतच छाप पाडली. अनेक वर्षांपासून रखडलेले जिल्ह्यांचे विभाजनही अंतुलेनी झटपट करुन दाखवले. लोकहितासाठी त्यांनी विविध योजनाही राबवल्या. शेतक-यांना कर्जमाफी, पेंशनवाढ, संजय गांधी निराधार योजना असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय अंतुलेंनी घेतले. महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून अंतुले ओळखले जात होते. मात्र इंदिरा गांधी यांच्या प्रतिभा प्रतिष्ठानला मदत करण्यासाठी सिमेंट घोटाळा झाला व अंतुले यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले.
१९८५ मध्ये अंतुले पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून आले. १९८९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली व त्यानंतर ते केंद्रातच रमले. केंद्रात आरोग्य, जलसंवर्धन अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले. मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांनी अल्पसंख्यांक मंत्री म्हणूून काम केले होते. मात्र २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गींतेनी अंतुले यांचा पराभव केला व त्यानंतर अंतुले सक्रीय राजकारणापासून दूर गेले.
ए. आर. अंतुले हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. यासाठी त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारही सुरु होते. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे. रायगडमधील आंबेत या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. लोकहितासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या होत्या. एक उत्तम प्रशासक व खंबीर नेतृत्व गमावले अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.