यवतमाळ/वाशिम : पावसाच्या अनियमिततेमुळे दुबार पेरणी करावी लागत आहे. त्यातच बोगस बियाणे आणि खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी संकटात अडकला आहे. या संकटात मदतीचा हात देण्याऐवजी राज्यातील सत्ताधारी हे पक्ष पळविण्यातच व्यग्र आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शेतकऱ्यांनीही जे विकले जाईल तेच पिकवावे, असेही आवाहन ठाकरे यांनी यवतमाळात रविवारी पत्रकार परिषदेतून केले.
भाजपसोबतच्या युतीत २०१९ मध्ये अडीच वर्षांचा मुख्यमंत्र्यांचा फाॅर्म्युला ठरला होता. तो त्यांनी पाळला नाही. यामुळे आता भाजपतील निष्ठावंतांवरच सतरंज्या उचलायची वेळ आली आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल. असा निर्णय घेतला नाही तर कोेर्टात दाद मागू, असेही ते म्हणाले.
भाजपाची टीका
ज्यांना आज तुम्ही बाजारबुणगे म्हणत आहात कधीकाळी त्यांच्याच जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झाला होतात, या शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तुमच्यामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले, हे विसरू नका. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवता आले नाही आणि पक्षप्रमुख म्हणून पक्षही सांभाळता आला नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.