मुंबई - लातूर जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या घराण्याव्यतिरिक्त आणखी एक मातब्बर घराणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुत्र अशोक निलंगेकर आणि त्यांचेच नातू पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर निलंगा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु, आजोबांना नातवापेक्षा मुलाचाच विधानसभा निवडणुकीत विजय व्हावा, अशी इच्छा आहे.
शिवाजीराव निलंगेकर 1985 ते 86 या कालावधीत मुख्यमंत्री होते. मात्र 2014च्या निवडणुकीत शिवाजीराव निलंगेकर यांचे पुत्र अशोक निलंगेकर यांना पराभूत करत संभाजी निलंगेकर यांनी विजय मिळवला. या विजयाबद्दल संभाजी निलंगेकर यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. इतकेच नव्हे, 2004मध्ये संभाजीरावांनी शिवाजीरावांचा अर्थात आपल्या आजोबांचा पराभव केला होता. एकूणच या मतदारसंघावर निलंगेकर कुटुंबियांचेच वर्चस्व दिसून येते.
आता या मतदार संघात काँग्रेसने पुन्हा एकदा अशोक निलंगेकरांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे संभाजी निलंगेकरांची लढत पुन्हा एकदा काकांशी होणार आहे. परंतु, या लढतीत मुळचे काँग्रेसचे असलेले शिवाजीराव निलंगेकरांना नातवाऐवजी पुत्रच विजयी व्हावा, असं वाटत आहे. त्यासाठी ते प्रयत्नशीलही आहेत.
राज्यात पुतण्यासाठी मतदारसंघ सोडणारे नेते असतानाच काका-पुतण्यांच्या लढती रंगत आहेत. बीड मतदारसंघातही जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे काका आमने-सामने आहेत. त्याचप्रमाणे निलंग्यात लढत होत आहे.