नांदेड - गेल्या महिनाभरात राज्यातील राजकीय वातावरण अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आणि उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून सातत्याने आम्हाला दाबण्याचा प्रयत्न झाला असा आरोप शिंदे समर्थक आमदारांनी केला. त्यात आता आणखी एका चर्चेने राजकीय तज्ज्ञांच्या भूवया उंचावल्या आहेत.
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणकाँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू आहे. नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे. या चर्चेवर आता अशोक चव्हाण यांनीच खुलासा केला आहे. खरेतर विधानसभेत बहुमत चाचणी ठरावावेळी काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर राहिले. त्यात अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे यांच्यासह इतर आमदारांचा समावेश होता. या गैरहजर आमदारांवर कारवाई करणार असल्याचं समोर येत आहे. त्यात अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू झाली. त्यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, मी काँग्रेसमधून बाहेर पडणार असा कुठलाही निर्णय घेतला नाही. चर्चेला काही महत्व नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.
भाजपाची अशोक चव्हाणांना ऑफरनांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी चव्हाणांना भाजपा प्रवेशाची ऑफर दिली. अशोक चव्हाण यांनी बहुमत चाचणीला गैरहजर राहून एकप्रकारे भाजपाला मदत केली. शिवाय बहुमत चाचणीला अशोक चव्हाण यांनी ४ आमदारांना गैरहजर ठेवले. त्यामुळे त्यांचे आभार मानणे माझे काम आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये आल्यास त्याचे स्वागतच करू असं प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटलं.
विधानसभेत बहुमत चाचणीवेळी शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यात काँग्रेसचे अनेक आमदार गैरहजर होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अदृश्य हाताने जी मदत केली त्यांचेही आभार मानले. तर आम्हाला फक्त २-३ मिनिटे उशीर झाला. आम्ही लॉबीत होतो तेव्हा विधानसभेचे दरवाजे बंद झाले. त्यामुळे कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मविआच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण करू नका. आमच्यात कुणीही नाराज नाही असं चव्हाणांनी सांगितले होते.